क्राईमगुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

8 दिवसांत तिसरी धडाकेबाज कारवाई ; 1.96 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

रिसोड पोलिसांनी गेल्या आठवडाभरात सलग तिसरी कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वृद्ध नागरिकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक करून एक विधी संघर्ष बालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल ₹1,96,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२४ ऑगस्ट रोजी मागवाडी गावातील एक वृद्ध नागरिक बँकेचे काम उरकून परतत होता. रात्री साडेआठच्या सुमारास लोणी फाटा परिसरात तो उभा असताना दोन इसम मोटारसायकलवर आले. “आम्ही मागवाडीला जातो, तुम्हाला सोडतो” असे सांगून त्यांनी वृद्धाला मोटारसायकलवर बसवले. त्यांच्या मागोमाग आणखी एक मोटारसायकलवर तीन युवक पाठलाग करत होते.

मेहकर फाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत टोळीने मोटारसायकल थांबवली. वृद्धाला खाली उतरवून चाकूचा धाक दाखवला. त्याच्या खिशातून ₹6,000 रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता “जिवाने मारू” अशी धमकी देत आरोपींनी वृद्धाचा घेराव घातला आणि तेथून पसार झाले.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी सखोल तपासाचे आदेश दिले. सपोनि शिवचरण डोंगरे व त्यांच्या पथकाने आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपींचा शोध लावला.

गजानन विश्वनाथ राऊत (20, रा. रिसोड), करण विलास पंडीत (22, रा. गैबीपुरा रिसोड), मंगेश मदन राजुरकर (30, रा. आनंदी नगर रिसोड), विजय शिवाजी सानप (रा. आनंदी नगर रिसोड), एक विधी संघर्ष बालक ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी आहेत.

या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोकड ₹6,000/ चाकू किंमत ₹500/- दोन मोटारसायकली किंमत ₹1,90,000/- असा एकूण ₹1,96,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कारवाईचे नेतृत्व निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी केले. तपास पथकात सहा. पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे, पोहेकॉ आशिष पाठक, अनिल राठोड, रुपेश मस्के, विश्वास चव्हाण, प्रभु जमडे, राजेश गांगवे, सुशिल इंगळे, अमोल ठाकरे यांचा समावेश होता.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही