भर पावसात धरणे आंदोलनाचा प्रहार ; भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांचा उघड व्यवहार

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
राजगुरुनगर (ता. खेड) येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा व संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी राजगुरुनगरच्या उपविभागीय कार्यालयासमोर मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा पुणे जिल्हा तर्फे भीषण पावसातही धगधगता धरणा आंदोलन पेटले. “महसूल प्रशासन जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, संबंधित तलाठी-मंडल अधिकाऱ्यांची खातीनिहाय चौकशी झालीच पाहिजे, “अन्यायग्रस्तांना न्याय द्या नाहीतर गादी खाली करा” अशा घोषणा देत आंदोलकांनी उपविभागीय कार्यालय दणाणून सोडले. भर मुसळधार पावसातही हे आंदोलन अखंड सुरू राहिले.
संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे आणि जिल्हा सरचिटणीस नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने महसूल प्रशासनाची झोप उडवली. अखेर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना आंदोलकांसमोर नतमस्तक व्हावे लागले आणि सर्व मागण्या मान्य करत सखोल चौकशी व दोषी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.
आंदोलनामागील मुख्य मुद्दे
फेरफार क्र. ५९९७ मधील गैरव्यवहार
स्वाती धनंजय गायकवाड व इतर मूळ जमीनमालक यांच्या नावे कोणतीही नोटीस न देता, तसेच तहसीलदारांच्या आदेशात नाव नमूद नसतानाही, मंडलाधिकारी चाकण यांनी १४/०२/२०२३ रोजी बेकायदेशीर फेरफार मंजूर केला. यामुळे अनुसूचित जातीतील बौद्ध शेतकऱ्यांची नावे बेकायदेशीरपणे ७/१२ वरून कमी करण्यात आली.
तात्कालीन तहसीलदारांच्या आदेशाचा दुरुपयोग
२९/११/२०१४ च्या आदेशाचा चुकीचा संदर्भ देऊन व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी नसताना फेरफार मंजूर करण्यात आला. यात स्पष्ट आर्थिक लोभ व जातीयवादाचे कारण असल्याचा आरोप आहे.
वाकी खुर्द गट नं. १ प्रकरण
मूळ सहहिस्सेदारांनी १२/०९/२०२४ रोजी खरेदीखत करून जमीन कायदेशीररीत्या विकली. परंतु नियमानुसार अर्ज दाखल झाल्यानंतरही मंडलाधिकारी चाकण यांनी मुदतीत नसलेली तक्रार स्विकारून शेतकऱ्यांना जातीयवादाच्या कारणास्तव अडचणीत आणले.
बेकायदेशीर दस्त नोंदणी व मारहाण प्रकरण
मीरा शांताराम जाधव व इतरांनी २०१३ मध्ये बेकायदेशीर दस्त नोंदवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. या वादात हनुमंत गायकवाड यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आंदोलनाला हरेशभाई देखणे, नितीन गायकवाड, विकास शिंदे, सोनू काळे, सुरेखा नाईकनवरे, रेखा कोळेकर, राणी रोकडे, प्राजक्ता वाघमारे, वैभव कदम, समीर गायकवाड, दत्ता गायकवाड, हरिष कांबळे, अतुल देखणे, संदीप खंडागळे, अमित गोसावी, विशाल खंडागळे, विशाल गोतारणे, अशोक गोतारणे, रामभाऊ गोतारणे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची नावे महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या कमी केली, असा गंभीर आरोप करून स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने प्रशासनाला धारेवर धरले आहे. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने आंदोलनाला तात्पुरता न्याय मिळाला असला तरी प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला.