गुन्हे विश्व्मराठवाडामहाराष्ट्र

फोनचा बहाणा ; १८ हजाराचा लागला चुना

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून, आता एका फोन कॉलवरून नागरिकांच्या खिशाला चटका बसू लागला आहे. अशीच एक घटना मंगरुळपीर शहरात उघडकीस आली असून, ‘तुमच्या खात्यात चुकून जास्त पैसे गेलेत, कृपया ते परत करा’, असा बनाव करून मठ मोहल्ला कांरजा रोड येथील एका महिलेची १८ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगरुळपीर पोलीस स्टेशन व सायबर सेल वाशिमकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी नामे अनिल शर्मा (मोबाईल क्र. ९२५१०६०६४२) या नंबरवरून पीडित महिलेच्या मोबाईलवर दोन मिस्ड कॉल आले. तिसऱ्यांदा फोन उचलल्यावर अज्ञात इसमाने महिलेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

तो म्हणाला, “तुमच्या पतीने मला १२,००० रुपये पाठवायला सांगितले होते, मी तुम्हाला १०,००० रुपये पाठवले, आणि आता २,००० रुपयेही पाठवतो.” काही वेळाने तोच पुन्हा संपर्क करून म्हणाला की, “चुकून तुमच्या खात्यात २५,००० रुपये पाठवले गेले आहेत. मला फक्त १२,००० रुपये द्यायचे होते. त्यामुळे उर्वरित रक्कम मला परत करा.”

या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने फोनपे अ‍ॅपद्वारे पंजाब नॅशनल बँकच्या साहीद उस्मान या व्यक्तीच्या (फोनपे क्र. ९०९९३८७७१९) खात्यात १८,००० रुपये पाठवले. नंतर जेव्हा तपासणी केली, तेव्हा लक्षात आले की कोणतेही पैसे तिच्या खात्यात जमा झालेले नव्हते. तसेच, तिच्या मोबाईलवर दाखवण्यात आलेले ‘पैसे जमा झाले’ हे मेसेज फेक होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, पीडित महिलेने तात्काळ मंगरुळपीर पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि सायबर सेल वाशिमकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सदर फिर्याद दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, फोन किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही आर्थिक मागणीवर तत्काळ विश्वास ठेवू नये. पैशांची देवाणघेवाण करताना प्रत्येक व्यवहाराची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस बळकट होत असल्याने सामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

“फसवणुकीचा सापळा, फोनवरचा विश्वास ठरला महागाचा”
या घटनेने मंगरुळपीर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही