वन्यजीव संरक्षणाची जाणीव ; परीट यांच्या धडपडीने पिलाला जीवदान

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव येथील सुरेश भाऊ खाडे युवा मंचाचे अध्यक्ष सुरेश परीट यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे माकडाच्या पिलाचे प्राण वाचले. काल गावात घडलेल्या या घटनेने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका माकडाच्या पिलावर नर माकडाने हल्ला करून चावा घेतला. त्यामुळे पिलाला गंभीर जखमा झाल्या. हा प्रसंग पाहताच सुरेश परीट यांनी तात्काळ धाव घेत वन विभागाशी संपर्क साधला. रात्री सुमारे दहा वाजता वन विभागाचे विशेष पथक गावात दाखल झाले.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे तसेच वन्यजीव बचाव पथकातील सूर्यकांत (नाना) यादव, सचिन साळुंखे, किरण नाईक यांनी समन्वयाने कारवाई केली. जखमी माकडाच्या पिलाला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन ते सांगली येथे वन विभागाच्या देखरेखीखाली उपचारासाठी हलवण्यात आले.
गावातील नागरिकांच्या मते, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रयत्नामुळे एका निरागस जीवाला नवीन संधी मिळाली आहे. सुरेश परीट यांनी दाखवलेल्या तातडीच्या निर्णयक्षमता व संवेदनशीलतेमुळे ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.