
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थासह अटक केली असून, एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सपोनि जयदीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी कारंजा शहर पोलिसांनी रिलायन्स बायपास परिसरातील प्राप्ती हॉटेलजवळ सापळा रचला. पांढऱ्या रंगाच्या बलेनो कार (क्र. एमएच-३७ व्ही-७७७) मधून दोन इसम एम.डी. अमली पदार्थ घेऊन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पंचासमक्ष चौकशीत आरोपींची नावे हाशीब उर्फ आरीस खान आसीफ खान (३२) रा. फारुख कॉलनी, कारंजा आणि अनिस खान सत्तार खान (५२) रा. मजीदपुरा, कारंजा अशी असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडून घेतलेल्या झडतीत २३.६० ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ (किंमत अंदाजे ₹२,३६,०००) आणि गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार (किंमत अंदाजे ₹५,००,०००) असा एकूण ₹७,३६,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करून हवालात ठेवण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कलम ८(क), २२(ब), २९ एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, पो.नि. सुधाकर आडे, राजेश खेरडे, तसेच डीएसबी शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास सपोनि प्रदीप अल्लापुरकर हे करीत आहेत.