Uncategorizedमहाराष्ट्र राज्य

कळंबी परिसरात म्हैसाळ योजनेच्या कालव्यावरील मुरुमावर तस्करांचा डल्ला ; शासनाचा महसूल बुडविणाऱ्या तस्करावर कारवाई कधी, ग्रामस्थांचा संतप्त सवाल

मुरूम तस्करांचा शासनाला चुना लावून थेट तालुका प्रशासनाला आव्हान

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | कळंबी परिसरात असणाऱ्या म्हैसाळ योजना कालव्याच्या मुरुमावर तस्करांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा गैरफायदा घेत तस्करांकडून शासनाचा महसूल बुडवून हा मुरुम लंपास केला जात आहे.

मिरज पूर्वभागात वाळूवर बंदी आल्यानंतर तस्करांनी गौण खणिजाचा प्रमुख भाग व मागणी असलेल्या मुरुम तस्करीकडे मोर्चा वळविला आहे. मुरुम तस्करीसाठी लागणारे तसेच उत्खननासाठी लागणारे जेसीबी यंत्र व वाहतुकीसाठी लागणारी डंपर ट्रकची स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. काही तस्कर राॅयल्टीची रक्कम भरुन नावाला मोजक्या पावत्या महसूल विभागाकडून घेवून त्याच्या चौपटीने मुरुम उत्खनन व वाहतुक करुन शासनाचा महसूल बुडवित असल्याच्या तक्रारी आहेत, तर काही तस्कर महसूल बुडविण्यासाठी विनापरवाना गाव परिसरात मुरुम उत्खनन करुन रात्रीत तो लंपास करुन गडगंज होत आहेत. सध्या मुरुम तस्करांनी म्हैसाळ कालव्यासाठी खुदाई केलेल्या मुरुमावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

कळंबी गावानजीक व महामार्गावरील विश्वासबापू यांच्या पेट्रोल पंपा समोर पश्चिम दिशेस असणाऱ्या म्हैसाळ पाणी योजनेच्या कालव्यावरील मुरुम रात्रीच्या वेळी जेसीबी यंत्राच्या मदतीने उचलून ट्रॅक्टर व डंपरने वाहतुक करुन चोरला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. कॅनाॅलवर ठिक-ठिकाणी यंत्राने मुरुम चोरल्याचे तर काही ठिकाठी कॅनाॅलवर टाकलेला मुरुम उत्खनन करुन खड्डे पाडले जात आहेत. म्हैसाळ योजनेचे अधिकारी पाण्याच्या आवर्तनाशिवाय कॅनाॅलकडे फिरकत नाहीत. त्यांचे दुर्लक्ष असल्याचा गैरफायदा तस्कर घेत आहेत. महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी असलेल्या मंडल अधिकारी व तलाठी यांचेही दुर्लक्ष आहे की जाणूनबुजून केले जात आहे. याबाबत ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा आहेत. कॅनाॅल मुरुम चोरीकडे दुर्लक्ष केल्यास कॅनाॅलच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

कळंबीबरोबर सिध्देवाडी परिसरातही रात्री व पहाटेच्या वेळी मुरुम चोरी होत असल्याचे बोलले जात आहे. काही सोकावलेल्या प्रतिष्ठित तस्कर मुरुम उत्खनन करुन तो लंपास करीत शासनाचा महसूल बुडवित असल्याचे बोलले जात आहे. हा मुरुम शासकीय योजनेच्या कामांना वापरला जात असल्याची चर्चा आहे. याच परिसरातून चोरीचा मुरुम काही गावातील विकास कामांना पोहचविण्याची जबाबदारी हे तस्कर पार पाडत असल्याने शासनाला चुना लावून थेट तालुका प्रशासनाला आव्हान देणाऱ्या अशा तस्करांच्या अधिकारी मुसक्या कधी आवळणार असा सवाल नागरीकातून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही