आरोग्य विभागांच्या योजनांचा’ लाभ नागरिकांना घ्यावा ; मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे आवाहन

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम प्रतिनिधी | गरजू व पात्र कुटुंबांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)’ या आरोग्य विमा योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव वाघमारे यांनी केले आहे.
या योजनांद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा देण्यात येते. हे उपचार शासकीय व खाजगी मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केले जातात.
वाशिम जिल्ह्यात २९ रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध:
१ जुलै २०२४ पासून वाशिम जिल्ह्यातील २९ शासकीय व खाजगी रुग्णालयांचा समावेश या योजनांतर्गत करण्यात आलेला आहे. यामध्ये ९ शासकीय व २० खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये सिंगल आणि मल्टी स्पेशालिटी सेवा उपलब्ध असून लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळू शकतात.
या २९ रुग्णालयांचा यामध्ये समावेश:
जिल्हा रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा, ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव, अनसिंग, कामरगाव तसेच खाजगी क्षेत्रातील बालाजी बाल रुग्णालय, मा. गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, बाजड हॉस्पिटल, वोरा हॉस्पिटल, साई हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल, गजानन चिल्ड्रन हॉस्पिटल, कानडे बाल रुग्णालय, विजय हृदयालय, काकडे क्रिटिकल केअर, डाळ हॉस्पिटल, देशमुख बाल रुग्णालय, वाशिम क्रिटिकल केअर, वाशिम प्रताप हॉस्पिटल वाशीम, गाभणे हॉस्पिटल वाशिम, जिजाऊ हॉस्पिटल वाशीम, खंडेश्वर हॉस्पिटल धानोरा, गजानन हॉस्पिटल रिसोड, श्री. गजानन बाल रुग्णालय मालेगाव इ. समावेश आहे.
काय आवश्यक आहे?
पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डासह ‘आरोग्य मित्र’ यांच्याशी संपर्क साधून आयुष्मान भारत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्ड तयार करणे आवश्यक आहे.
“आरोग्य ही मूलभूत गरज असून सरकारने उपलब्ध करून दिलेल्या मोफत उपचार योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीने घ्यावा. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे उपचार थांबता कामा नये.”
वैभव वाघमारे, (मूख्य कार्यकारी अधिकारी जि. प.)