कामगारांच्या जीवाशी खेळ कुणाचा? मिरज सिव्हील दुर्घटनेची शिवसेनेकडून गंभीर दखल

जखमी कामगारांची रुग्णालयात भेट; दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

LiVE NEWS | UPDATE

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज | मिरज सिव्हील हॉस्पिटल परिसरातील बांधकामाधीन कमानीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेची शिवसेना बांधकाम कामगार सेनेने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांची रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. तसेच संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन जखमी कामगारांच्या उपचाराबाबत व प्रकृतीची माहिती घेण्यात आली.

दुर्घटनेनंतर शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेतली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले असल्यास संबंधित दोषी कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का आणि दुर्घटनेमागील नेमकी कारणे काय आहेत, याची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. जखमी कामगारांना उपचारासाठी आवश्यक ती मदत मिळावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा. अण्णासाहेब (बापू) देशमुख आणि पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. शरद महादेव यमगर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *