“कोंबडीच्या नवसाने” तहसील हादरले

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शासनाच्या तिजोरीला पोखरणारा आणि स्वस्त धान्याच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करणारा पुरवठा विभाग अखेर एका कोंबडीच्या नवसाने* जागा झाला. विकास दाभाडे या सामाजिक कार्यकर्त्याने देवाप्रमाणे तहसील कार्यालयासमोर कोंबडीसह साखळी आंदोलन छेडून तहसीलदारांच्या खुर्चीलाच धसका दिला आहे.

स्वस्त धान्याच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे आरटीओ कागदपत्र, विमा, परवाने, कर भरपाई आदी कागदपत्रांची पूर्तता न करताच नियमबाह्य वर्षानुवर्षे वाहने रस्त्यावर धावत आहेत. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, याकडे डोळेझाक करणारा पुरवठा विभाग जणू “झोपेचं सोंग” घेत होता. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत विकास दाभाडे यांनी २४ मे २०२४ रोजीच यावर तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. पण प्रशासनाच्या डुलक्या चालूच राहिल्या. स्मरणपत्रावरही फक्त मौनाची मोहोर ! अखेर प्रशासनाच्या कानावर चटके देण्यासाठी दाभाडे यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी *कोंबडीचा नवस* करून थेट तहसील कार्यालयासमोर आंदोलन उभारलं.

कोंबडी पुढे, न्याय मागे
“कोंबडीची कूऽक” झाली आणि तहसीलदार कार्यालयात गडबड उडाली. ‘कोंबडीच्या नावाने’ आंदोलन हा प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. साखळी आंदोलनात गगनभेदी घोषणा, जनतेचा रोष आणि कार्यकर्त्यांची एकजूट ठळकपणे दिसून आली.
सदर आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता शेवटी तहसीलदार महोदया समोर आल्या. दाभाडे यांचं म्हणणं ऐकून त्यांनी उचित कारवाईसाठी पंधरा दिवसांचा अवधी मागितला. तसेच आंदोलन कर्त्यास कारवाईचं आश्वासन पत्र दिलं आणि आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं. मात्र, नागरिकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. हे नवस तहसील जागं करतो का? की पुन्हा ढिम्म झोपा घेत थंडबस्त्यात फाईल झाकतो? आता तर “कोंबडी देवासाठी नव्हे, तर न्यायासाठी यायला लागली आहे. आता तहसीलचे पत्ते उडणार की कोंबडी पुन्हा कू करणार? हे येणाऱ्या पंधरा दिवसांत स्पष्ट होणार आहे.
या एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनात गौरवकुमार इंगळे, कृष्णा आमटे, बबलू इंगळे, सतीश इंगळे, विठ्ठल खडसे, शिवा आडात, संजय ईगोले, प्रतम येवले, सिधू मोरे, रौनक ससाने, ओम खंडारे, मयूर थोंबे, सचिन कसार इ. युवकांची उस्फुर्त पणे उपस्थिती होती.