क्रिडात्मकमनोरंजनसामाजिक

क्रिकेट स्पर्धेतून भायखळ्यात संविधानाचा गौरव

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भायखळा विभागातील भीम नगर परिसरात तरुणांच्या पुढाकाराने अनोख्या आणि उत्साहपूर्ण पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भीम नगर प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशाप्रती आदर, संविधानाबद्दल अभिमान आणि युवकांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृत करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व देशभक्तीपर उपक्रम राबविले जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. याच परंपरेला पुढे नेत भायखळ्यातील तरुणांनी खेळाच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भीम नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सामूहिक राष्ट्रगीताने झाली. यानंतर नागरिकांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारत माता की जय, भारतीय संविधान चिरायू होवो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी अल्पोपहाराचा आनंद घेत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामुळे स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अत्यंत चुरशीचे व रोमांचक सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. आयोजकांच्या वतीने दुपारच्या वेळेस सामूहिक भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संविधानाचे महत्त्व, युवकांची जबाबदारी आणि सामाजिक एकतेवर भर दिला. यावेळी मनोज कदम यांच्या हस्ते रहाटे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज कदम, जितेंद्र कदम, सुजल शिर्के, रोहन कांबळे, तुषार सरोदे, सुजल पवार, प्रतिक पवार, अक्षय पवार, आर्द्रश जाधव, आशिष जाधव, योगेश गायकवाड, चंदन ठाकुर, जय सुर्वे, शादाब, आदिराज जाधव, कार्तिक शिर्के, नितीन सोनवणे, मुकेश शिर्के, राकेश शिर्के, श्रीकांत वाढाणे यांनी विशेष मेहनत घेतली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही