क्रीडा विश्व्महाराष्ट्रराजकारणसामाजिक

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावर राजकीय वादाची छाया ; ७०० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

खटाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मारुती पाटील व रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते सलगरे–खटाव कबड्डी उद्घाटन सामना.

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | खटाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य क्रीडांगणावर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. लिंगनूरचे माजी सरपंच मारुती पाटील व खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात गावातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात न आल्याने शाळेमध्ये राजकारण होत असल्याच्या चर्चांना गावात उधाण आले आहे.

गावातील सर्वच गटांचे प्रतिनिधी असताना केवळ एका गटातील नेत्यांनाच उद्घाटनाचा मान देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. “गावातील नेत्यांना डावलून दुसऱ्या गावातील नेत्यांना कसे काय आठवले?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या व्यासपीठावर राजकीय भेदभाव करत असल्याचा आरोप चर्चेत आला आहे. क्रीडा स्पर्धेसारख्या विद्यार्थीकेंद्रित व सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमात राजकीय वाद निर्माण होणे ही खेदजनक बाब असल्याची भावना काही पालक व नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या सर्व चर्चांवर पडदा टाकत क्रीडा स्पर्धा मात्र अत्यंत उत्साहात सुरू आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खटाव केंद्राच्या वतीने दोन दिवसांची केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये तब्बल ७०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे. लिंगनूर, खटाव, सलगरे, जानराववाडी, चाबुकस्वारवाडी या मुख्य गावांसह वाडी-वस्तीवरील सर्व जिल्हा परिषद शाळांचा सहभाग या स्पर्धेत आहे.

या क्रीडा स्पर्धांमध्ये द्विशिक्षकी शाळांसाठी स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो, कबड्डी व रिले हे तीन सांघिक क्रीडा प्रकार तर गोळा फेक, धावणे व लांब उडी हे तीन वैयक्तिक क्रीडा प्रकार मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे, लहान व मोठ्या गटात घेण्यात येत आहेत. क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा शपथ घेण्यात आली आणि त्यानंतर सामन्यांना सुरुवात झाली. उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद शाळा सलगरे क्रमांक एक व जिल्हा परिषद केंद्र शाळा खटाव (लहान गट मुले) यांच्यात खेळवण्यात आला.

उद्या, शुक्रवारी मोठ्या गटातील सांघिक सामने चुरशीने पार पडणार असून सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. क्रीडा स्पर्धेचे संयोजन केंद्रप्रमुख सहदेव बागी, क्रीडा समिती अध्यक्ष हणमंत आरगे, समन्वयक आकाश जाधव, खटाव केंद्र शाळेतील क्रीडा शिक्षक व सर्व स्टाफ तसेच केंद्रातील सर्व शाळांतील शिक्षक पंच व संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

या प्रसंगी लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील यांच्याकडून सर्व ७०० खेळाडूंना दुपारचे जेवण व आहार देण्यात आला. कार्यक्रमास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, बँकेचे संचालक मिलन नागणे, खटाव शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही