हत्यारबंद टोळीचे कटकारस्थान उधळले ; शस्त्रे जप्त, चार तासात पोलिसांनी चौघांना पकडले

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मिरज सिव्हील हॉस्पिटलसमोर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर हल्ला करण्याच्या तयारीने दबा धरून बसलेल्या टोळीचा पोलिसांनी अक्षरशः खेळ करून टाकला. अवघ्या काही क्षणात आरोपींची धडपड थांबवत, ०४ कोयते आणि ०२ दुचाकीसह संपूर्ण हत्यारसाठा जप्त करत महात्मा गांधी चौक पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेला बळ देत जबरदस्त धडाकेबाज कारवाई केली.
दि. १२ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हीलमध्ये आणलेल्या आरोपींच्या हालचालीवर नजर ठेवताना संशयित वंश वाली हा ओपीडीसमोर पिस्तुल आणि लोखंडी कोयत्यासह फिरताना आढळला. तात्काळ त्याला जेरबंद करत गु.र.नं. २९१/२०२५ अन्वये हत्यारबंदी व पोलिस अधिनियमाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपासात त्याचे साथीदार अक्षय फोंडे, समर्थ गायकवाड, समर्थ पोतदार आणि वैभव आवळे यांचा सामूहिक सहभाग उघड झाला.
विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासांत पथकाने आरोपींना पकडत कारवाईचा वेग दाखवला. न्यायालयीन आदेशानुसार पोलिस कोठडीत असताना सपोनि संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक धारदार झाला. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर लपवून ठेवलेली हत्यारे कुठे टाकली याचा शोध घेऊन पोलिसांनी ४ कोयते, १ कुकरी, तसेच होंडा डिओ आणि बजाज प्लसर या दोन दुचाकी जप्त केल्या.
आगामी निवडणुकांचा माहोल आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा टायमिंगसहचा तडाखा लक्षवेधी ठरला आहे. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत नागरिकांनी माहिती दिल्यास गोपनीयतेची खात्री देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.