गुन्हे विश्व्महाराष्ट्र

घरफोडीचे ०९ गुन्हे उघड ; अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ; दोन आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क कारवाईला यश

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

वाशिम जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या घरफोडीच्या तब्बल ०९ गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीतील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे वाशिम परिसरात घबरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, पोलीस तपासामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दि. ०८ जुलै २०२५ रोजी वाशिमला झालेल्या भेटीत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रामनाथ पोकळे (अमरावती परिक्षेत्र) यांनी रात्र घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेत विशेष सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अनुज तारे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मार्गदर्शन करून तपासाला गती दिली होती.

त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने विविध गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज, आणि आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून एक अभ्यास तयार केला. तपासादरम्यान हे समोर आले की बुलढाणा जिल्ह्यातील टोळ्या वाशिमसह अकोला, अमरावती, परभणी, बिड अशा विविध जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवण्यात येत होती.

तपासादरम्यान बिबी (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील ईश्वर उर्फ प्रभुराज युवराज पवार (वय २५) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने वाशिम जिल्ह्यात ०९ घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचा साथीदार शामराव रामकिशन पवार (वय ३२, रा. जांभरून नावजी, जि. वाशिम) यासही अटक करण्यात आली. दोघांना १२ जुलै रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने ०४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी रिसोड, मालेगाव, वाशिम ग्रामीण, मंगरुळपीर आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर, तसेच त्यांच्या चमूने केली. अंमलदार दिपक घुगे, दिपक सोनोने, गजानन अवगळे, सुरज खडके, महिला अंमलदार सुषमा तोडकर आणि इतरांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती संकलन आणि समन्वय साधून अथक मेहनतीने ही कारवाई फत्ते केली.

या उल्लेखनीय कारवाईची दखल वरीष्ठ पोलीस पातळीवरही घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही