चारित्र्य संशयावरून महिलेचा खून ; हल्लेखोर पती गजाआड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
जत | रेवनाळ येथे महिलेवर हल्ला करून डोक्यात दगडी वरवंट्याने वर्मी घाव घातल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुक्मिणी विलास खांडेकर असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत पतीने किरकोळ कारणावरून खून केल्याचा गुन्हा पती विलास विठोबा खांडेकर याच्यावर जत पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, रेवनाळ येथील विलास खांडेकर याचा येथील रुक्मिणी सरगर हिच्याशी विवाह झाला होता. विलास याला दारूचे व्यसन होते. दारू पिवून तो वारंवार पत्नीशी भांडण काढीत होता. शिवाय तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
एक एप्रिलच्या रात्री विलासने दारू पिवून पत्नीशी भांडण काढले. त्याने दारू प्यायला विरोध करतेस आणि तुझ्या माहेरची लोक सारखे घरी का येतात, असे म्हणून पत्नीवर हल्ला केला. रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सांगली येथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुक्मिणीचा भाऊ विलास सरगर याने जत पोलिसात विलास खांडेकरावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विलासला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिसांत पती विलासवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, रुक्मिणीचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा सुरू आहे.