विदर्भ

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इकबाल शेख

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ‘एनटीव्ही मराठी न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक इकबाल शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. या निवडीमुळे डिजिटल मीडिया क्षेत्रात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इकबाल शेख यांना पत्रकारितेचा तब्बल २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागांत त्यांनी वरिष्ठ पत्रकार म्हणून सातत्याने काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर त्यांनी परखड लेखन व वृत्तांकन केले असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

संघटनात्मक कार्यातही इकबाल शेख यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी, कायदेशीर प्रश्न, मान्यता आणि सुरक्षितता यांसंदर्भात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल पत्रकारांची अग्रगण्य संघटना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत संघटनेचे मजबूत जाळे आहे. डिजिटल पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या व्यावसायिक सुरक्षेसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी संघटना कार्यरत आहे. इकबाल शेख यांनी संघटनेच्या विस्तारासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले असून त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना इकबाल शेख म्हणाले की, “डिजिटल मीडिया क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. या क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सन्मानासाठी अधिक जोमाने काम करणार आहे. संघटनेला राज्यभर अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करू.

डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व लाभल्यामुळे संघटनेची ताकद अधिक वाढेल, असा आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला. इकबाल शेख यांच्या निवडीमुळे डिजिटल पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही