थंडी वाढली, पण राजकारण तापलं ; सणबुर गणातून पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
पंचायत समितीत थेट प्रतिष्ठेची लढाई ; देसाई गट पूर्ण ताकदीने मैदानात

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
पाटण | जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा आता चांगलाच उडू लागला आहे. थंडीचा कडाका वाढतो आहे, पण राजकीय पारा मात्र दिवसेंदिवस चढतो आहे. माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत) असली, तरी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी कोणतीही वाट न पाहता प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. परिवर्तनाच्या या लढाईचा श्रीगणेशा थेट सणबुर पंचायत समिती गणातून झाला असून, येथूनच संपूर्ण तालुक्यातील राजकीय लढतीला धार आली आहे.
शिवसेना (शिंदे गट) कडून सौ. संपदा संदीप जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच सणबुरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराचा नारळ सणबुरच्या ग्रामदैवत श्री. विठ्ठलाई देवी, जोतिबा, काळंबाई देवी व श्री क्षेत्र नाईकबा या देवदेवतांचे दर्शन घेऊन फोडण्यात आला. देवदर्शनानंतर सौ. संपदा संदीप जाधव थेट मतदारांच्या दारी पोहोचल्या असून, प्रचारात गती आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे.
सणबुर पंचायत समिती गण ही यावेळी केवळ एक जागा नसून, दोन गटांच्या प्रतिष्ठेचा थेट सामना बनली आहे. एका बाजूला भाजप महायुती, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे गट) अशी ताठ मानेची लढत होणार आहे. पाटण तालुक्याचे राजकीय लक्ष सध्या याच गणावर केंद्रीत झाले असून, “येथे जो जिंकेल, त्याचा तालुक्यात आवाज वाढेल” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ओबीसी महिला आरक्षणामुळे ही निवडणूक आणखी धारदार बनली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश केलेले संदीप युवराज जाधव यांच्या पत्नी सौ. संपदा संदीप जाधव यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मागील निवडणुकीत तुषार जाधव यांच्या पत्नी सौ. विजया जाधव यांनी कडवी झुंज दिली होती, मात्र थोडक्यात पराभव झाला होता. तो पराभव देसाई गटासाठी अजूनही बोचरा ठरतो आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी संपदा जाधव यांच्या माध्यमातून तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे.
मागील पंचायत समिती निवडणुकीत देसाई साहेबांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना अपेक्षित वेळ देता आला नव्हता. मात्र यावेळी चित्र पूर्णपणे बदलले आहे. पालकमंत्री तसेच पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराजे देसाई स्वतः ठाण मांडून मैदानात उतरणार असल्याने लढतीला हाय-व्होल्टेज स्वरूप आले आहे. “काम, विकास आणि शिक्षण” या त्रिसूत्रीवर उमेदवार निवडल्याचा दावा देसाई गटाकडून केला जात आहे.
दरम्यान, मंद्रुळ कोळे जिल्हा परिषद गणातून मृणाल महेश पाटील, तर मंद्रुळ कोळे पंचायत समिती गणातून नितीन दत्तात्रय काळे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार उच्चशिक्षित असून, विकासाभिमुख चेहऱ्यांवरच यावेळी भर देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मा. मनोज पाटील (सरपंच, ग्रा.पं. बनपुरी), मा. अशोक पाटील (बनपुरी), आप्पासाहेब मगरे, एकनाथ जाधव आणि दिलीप जानुगडे काका यांनीही “व्यक्तीपेक्षा काम महत्त्वाचे” असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच सणबुर गणात राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. ही निवडणूक उमेदवारांची नाही, तर ताकद, रणनीती आणि भविष्यातील राजकारणाची चाचपणी ठरणार आहे.
सणबुरचा कौल संपूर्ण तालुक्याची दिशा ठरवणार, यात शंका नाही.