धानोरा प्रकरणी ‘निळे वादळ’ आक्रमक ; चर्चेनंतर मागण्या मान्य

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा गावात झालेल्या जातीय हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या. या पार्श्वभूमीवर उमेश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आंदोलक मंगरुळपीर पोलीस ठाण्याकडे निघाले होते. आंदोलक पोलीस ठाण्यावर धडक देण्यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी स्वतः हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली.
हिवराळे यांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चेसाठी बोलावून घेतले. त्याठिकाणी आंबेडकरी नेत्यांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. चर्चेदरम्यान धानोरा प्रकरणातील मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी एसपी अनुज तारे यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संभाव्य तणाव टळून परिस्थिती आटोक्यात आली.
यानंतर सर्व आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येत मंगरुळपीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर मंगरुळपीर पोलीस ठाण्यावर पोहोचून मागण्यांचे लेखी निवेदन अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
या संपूर्ण घटनेदरम्यान ‘निळे वादळ’ म्हणून ओळखले जाणारे आंबेडकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी करत होते. जातीय हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी, धानोरा प्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंबेडकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे.