निवडणूक पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; शेलूबाजार येथे तलवार जप्त

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
आगामी जिल्हा परिषद निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करून गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला आहे.
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगरुळपीर पोलीस ठाणे हद्दीतील शेलूबाजार येथे दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी कारवाई केली.
शेलूबाजार येथील सोनू उर्फ शेख राजीक शेख मोहम्मद (वय २४, रा. शेलूबाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) हा त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे तलवार बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचासमक्ष झडती घेतली. या झडतीदरम्यान घरातून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीविरुद्ध मंगरुळपीर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात तसेच गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर, पोहवा राहुल व्यवहारे, पोअं. राजकुमार यादव, भुषण ठाकरे, अविनाश वाढे, तुषार ठाकरे, शुभम चौधरी व पोलीस अंमलदार सुनील तायडे यांनी केली.