कोकणमहाराष्ट्रराजकीयरायगडसामाजिक

महायुतीतून लढणार रिपब्लिकन पक्ष ; जागा न दिल्यास स्वबळावर झुंज ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा इशारा

महाडमध्ये मुसळधार पावसात रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

रायगड | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

महाड (प्रतिनिधी) | राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत सहभागी होणार असून, ज्या ठिकाणी समाधानकारक जागा मिळणार नाहीत, तेथे पक्षाने स्वबळावर उमेदवार उभे करून विजय मिळवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी केले.

महाड येथील चांदे मैदानावर झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ६९ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. प्रचंड मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. परिवर्तन कला महासंघाच्या गायकांनी सादर केलेल्या भिमगीतांवर श्रोते मंत्रमुग्ध झाले.

राज्यभरातून हजारो रिपाइं कार्यकर्ते महाडमध्ये दाखल झाले होते. निळ्या झेंड्यांनी नटलेले महाड शहर रिपब्लिकन एकतेचे प्रतीक बनले होते. सभेपूर्वी ना. आठवले यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महाड ही आंबेडकरी चळवळीची क्रांतिभूमी आणि प्रेरणास्थळ असल्याने, या भूमीत पक्षाचा वर्धापनदिन साजरा केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी आठवले यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते. यावेळी राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. त्यांनी आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

ना. गोगावले म्हणाले, २० मार्च २०२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने चवदार तळे, क्रांतीस्तंभ आणि संपूर्ण महाडचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. गोल्डन टेम्पलच्या धर्तीवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.

ना. आठवले म्हणाले, “शताब्दी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारकडून भरीव निधी आणून महाड क्रांतिभूमीचे रुपडे पालटण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने आपली ताकद दाखवावी. फक्त बौद्धवाड्यांपुरतेच नव्हे, तर सर्व समाज घटकांना सोबत घेत गावागावात शाखा स्थापन करा. रिपब्लिकन पक्ष हा एका जातीधर्माचा नव्हे, तर सर्व जातीधर्मीयांचा पक्ष आहे.

यावेळी सौ. सीमाताई आठवले आणि त्यांचे सुपुत्र जीत आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवा आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे, तसेच सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, अमित तांबे, सचिन कासारे, अजित रणदिवे, ॲड. आशाताई लांडगे, आणि अनेक मान्यवरांचा समावेश होता.

भरपावसातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दाखवलेले संघटन, जिद्द आणि निष्ठा पाहून सभागृहात “जय भीम”चा नारा घुमला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही