मनोरंजनमहाराष्ट्र

पाटणला आजपासून तीन दिवस ‘पाटण महोत्सवा’चा धुरळा

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे

पाटण येथे आजपासून तीन दिवस ‘पाटण महोत्सवाच्या’ माध्यमातून करमणुकीच्या कार्यक्रमांचा धुरळा उडणार आहे. खेळ पैठणीचा, दि जगदंब फोक अख्यान, सामूहिक नृत्य सादरीकरण तसेच सिनेअभिनेत्री कल्याणी नंदकिशोर आणि सिनेअभिनेते समृद्धीबाबा जाधव यांचा ‘हसण्यासाठी जन्म आपला’ या बहारदार कार्यक्रमांचा लाभ पाटण तालुकावासियांना मिळणार आहे.

कोयना एज्युकेशन सोसायटी आणि रोटरी क्लब पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ‘पाटण महोत्सव’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भव्य प्रदर्शन, विक्री तसेच विविध मनोरंजन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण तसेच हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात कृषी प्रदर्शनासह संसारोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल्स तसेच विविध महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

बाळासाहेब देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. कळंत्रे, रो. जगदीश शेंडे, सहसमन्वयक डॉ. पी. वाय. फडणवीस, समन्वयक डॉ. एच. व्ही. काटे, डॉ. दीपक डांगे, डॉ. विनायक राऊत, प्रा. व्ही. एस. माथणे, डॉ. एस. पी. पाटील, प्रा. अनिल पाटील तसेच रोटरी क्लबच्या पुढाकाराने आणि सहकार्याने कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

पाटण महोत्सवात मनोरंजनाची मांदियाळी

दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ‘लागिर झालं जी’ फेम कल्याणी नंदकिशोर यांचा महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता स्वरसह्याद्री ग्रुपची संगीत मैफल आणि सायंकाळी ६ वाजता ‘संगीत लोकधारा’ प्रस्तुत लोकगीतांवर आधारित ‘दि जगदंब फोक अख्यान’ सादर होणार आहे.

दि. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लावणी व कथक या नृत्यप्रकारांवर आधारित सामूहिक नृत्य सादरीकरण होईल. सायंकाळी ६ वाजता सिनेअभिनेते समृद्धी जाधव यांचा ‘हसण्यासाठी जन्म आपला’ हा बहारदार कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक याज्ञसेन पाटणकर यांनी दिली.


विविध स्टॉल्स आणि आकर्षणे

महोत्सवात व्यापारी, उद्योजक, कला, खाद्य व कृषी क्षेत्रातील विविध स्टॉल्स असणार असून बहुतांश स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. पंढरपूरचा तपेला बैल, बंगाली कॅट, विविध प्रकारच्या कोंबड्या तसेच शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती विषयक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा विचार करून विविध उपक्रम ठेवण्यात आले आहेत. महिलांसाठी ‘पैठणीचा खेळ’ तर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लकी ड्रॉ’ कूपनची सोय करण्यात आली आहे. तसेच काही सेलिब्रिटींची उपस्थितीही असणार आहे.

कोयना एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम शक्य झाला असल्याचे प्रा. डॉ. काटे यांनी सांगितले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही