“भिडेचं तोंड बंद करा” ; रामदास आठवले यांचा संतप्त हल्लाबोल

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
आंबे खाल्ल्याने मूलं होतात, सर्वधर्मसमभाव म्हणजे नपुंसकपणा, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवा’… अशी एक ना दोन, संभाजी भिडे यांची वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यं सातत्याने सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भिडे यांनी वाचा फोडल्याने, राज्याच्या पुरोगामी प्रतिमेवर घाला येतोय, असा रोष व्यक्त करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी थेट भिडेंवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिकमधील एका व्याख्यानात भिडे यांनी ‘सर्वधर्मसमभाव म्हणजे नीचपणा’ असं विधान करत देशातील संविधान, लोकशाही मूल्यं आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर थेट हल्ला केला आहे. याचाच निषेध करत आठवलेंनी म्हटलं की, सर्वधर्मसमभाव ही भारताची ओळख आहे, आणि त्याला नपुंसकपणाचं लेबल लावणं म्हणजे देशाच्या मूल्यांचा अपमान आहे.
याच व्यासपीठावर भिडे यांनी पुन्हा एकदा जुनं वादग्रस्त विधान उचलून धरलं मी बोललो होतो की आंबे खाल्ल्याने मुलं होतात. मी आजही आंब्याचं झाड लावलंय, ते आंबे खा, अशा थाटात त्यांनी आपली अंधश्रद्धा पुन्हा एकदा जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालंय.
या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, अशा बेताल आणि अर्वाच्य वक्तव्यांमुळे समाजात फूट पडते, रोष निर्माण होतो, आणि तीव्र प्रतिक्रिया उद्भवतात. हे वक्तव्य केवळ बेजबाबदारच नाही, तर देशाच्या एकात्मतेला मारक आहे. इतिहासाची विकृती करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ही सहनशीलतेची कसोटी नाही, ही लोकशाहीच्या मर्यादांची पायमल्ली आहे.
आता रामदास आठवले यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनी थेट भिडेंच्या विधानांवर आवाज उठवल्यानंतर, सरकार यावर काय भूमिका घेणार, भिडे यांच्यावर खरंच कारवाई होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.