मस्टर पेमेंट !… आले अंगलट !…
उपोषणाचा दणका, आयुक्तांचा आदेश सीईओने केले चार कर्मचारी कार्यमुक्त

LiVE NEWS | UPDATE
देवणी प्रतिनिधी | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
गावगौंड (विजयनगर) ता.देवणी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याचा काम न करताच कागदोपत्री रस्त्याचे काम झाल्याचे दाखवून मस्टरद्वारे (हजेरी पत्रक) 3 लाख 61 हजार 449 रुपये काम न करताच पैसे उचलून अपहार करण्यात आला आहे. संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात तक्रार देऊनही दखल घेत नसल्याने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. तात्काळ दखल घेऊन डॉ.अनंत गव्हाणे उपायुक्त रोहया यांनी उपोषणकर्त्यांच्या समोर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांना फोन द्वारे आदेश दिले की, ज्या कर्मचाऱ्यांनी काम न करताच शासनाकडून पैसे घेऊन अपहार केले आहे त्यांच्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करून दुपारी तीन वाजेपर्यंत चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयासह उपोषण कर्त्यानां द्यावे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे श्री.अनमोल सागर भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी दोषी चार कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणीसह दंतराव व पवार यांना दिले.
सविस्तर माहिती अशी की, गौंडगाव (विजयनगर) ता.देवणी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम न करताच कागदोपत्री रस्त्याचे काम झाल्याचे दाखवून मस्टरद्वारे 3 लाख 61 हजार 449 रुपये काम न करताच पैसे उचलून अपहार केल्याची तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दिल्याने सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी संयुक्त त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. समितीचा अहवाल प्राप्त असून तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्यक्ष जाऊन त्रीसदस्यिय समितीने चौकशी केली असता, मस्टर अगोदर काढून काम नंतर केल्याचे निष्कर्ष काढून संबंधित ग्रामरोजगार सेवक यांनी गैरशिस्तीचे वर्तन केल्याचे नमूद आहे.
संबंधित ग्रामरोजगार सेवक स्वतःचे नावे मस्टर पेमेंट करू शकत नसताना त्यांनी स्वतःच्या नावे मस्टर पेमेंट पण केल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच श्री.प्रमोद पाटील संगणक परिचालक ग्रामपंचायत गौंडगांव हे संगणक परिचालक म्हणून कामावर असताना नरेगा अंतर्गत तक्रार झालेल्या रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून काम केल्याचे व मस्टर पेमेंट उचलल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचे हे वर्तन गैरशिस्तीचे आहे. संबंधित रोजगार सेवक श्री. व्यंकट बिरादार यांना येत्या ग्रामसभेत कामावरून काढून टाकावे. तसेच श्री. प्रमोद पाटील यांच्याकडील ग्रामपंचायत गौंडगांव तालुका देवणी चे युजर आयडी व पासवर्ड काढून घ्यावा व त्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करावे.
त्रीसदस्यिय समितीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये श्री. दिनेश पवार यांनी काम न करताच रस्त्याचे मस्टर पेमेंट मोजमाप पुस्तिकेशिवाय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या गैरशिस्तीच्या वर्तनाबद्दल त्यांना पंचायत समिती देवणी येथील तांत्रिक सहाय्यक पदाच्या सेवा संपुष्टात आणून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
गौंडगाव येथील मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी त्रीसदस्यिय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता, सदर चौकशीमध्ये मौजे गौंडगाव येथील रस्त्याच्या कामाचे मस्टर पेमेंट अगोदर होऊन काम नंतर झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. सदरचे काम होण्यापूर्वीच मस्टर पेमेंट होणार नाही याची दक्षता सहाय्यक कार्यक्रम म्हणून श्री.अरुण दत्तात्रय दंतराव यांनी घेणे आवश्यक असताना त्यांनी तशी कारवाई न करता गैरशिस्तीचे वर्तन केले आहे. त्यांच्या या गैरशिस्तीच्या वर्तनाबद्दल त्यांना पंचायत समिती देवणी येथील सहाय्यक कार्यक्रम पदावरील वरून सेवा संपुष्टात आणून त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याने सदर उपोषणाची दखल दोन दिवसानंतर घेण्यात आली.
उपोषणातील मागण्या मान्य झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले सदर उपोषण संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष अजीम शेख यांनी उपोषण केले. त्या उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.