विदर्भसामाजिक

सामाजिक कार्यकर्ते व निर्भीड पत्रकार फुलचंद भगत यांना ‘आदर्श पुरस्कार’

नागपूर येथे भव्य सोहळ्यात गौरव ; समाजहितासाठी लेखणीची धार कायम ठेवण्याचा निर्धार

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे आणि निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे वाशिमचे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दि. २ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील वनामती कॅम्पमधील धरमपेठ येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भगत यांचा गौरव झाला.

हा पुरस्कार सोहळा महात्मा गांधी जयंती, यहोवा यिरे फाउंडेशनचा वर्धापनदिन तसेच उद्योग चित्रपट व सत्यवेध न्यूज चॅनलच्या शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी यहोवा यिरे फाऊंडेशनचे डायरेक्टर व सीईओ प्रा. डॉ. रमेशकुमार बोरकुटे, मिसेस बोरकुटे, एलिजा बोरकुटे, प्रसिद्ध टीव्ही अँकर व अभिनेत्री सिमरन अहुजा, अभिनेत्री एलिना तुतेजा, राष्ट्रीय उद्योग संघटनेचे महामंत्री सुनीलकुमार मांडवे, भारत सरकारचे टीसीए सदस्य डॉ. मनीष गवळी, राम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव शेषराव अजगरे, प्रा. डॉ. विनोद चौधरी, जेष्ठ पत्रकार डी.के. आरीकर, शामलाल जयदेव, दै. देशोन्नतीचे जी.एम. रितेश नायर, नागपूर मेट्रो समाचारचे इरफान द्रवडी, मेकअप आर्टिस्ट प्रदीप मारोतकार, प्रा. शेख नदिम, निखील पवार, अशोक जाधव, मिस आशिया वर्ल्ड-२०२५ विजेती गायत्री रोहणकर, दर्पन संपादक सुशिल पांडे, सचिन निमसे, राजेंद्र पाठक, नरेंद्र पिंपळकर, आॅडिटर राहुल जोगी यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.

फुलचंद भगत हे पत्रकारितेतून सामाजिक भान जागृत करत असून शासन-प्रशासन आणि जनता यामधील दुवा बनून कार्यरत आहेत. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे, शेतकरी-कष्टकरी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे, तसेच गोरगरिबांना मदतीचा हात देणे हे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. महिला सक्षमीकरण, लोकहित जोपासणे आणि सामाजिक प्रश्नांवर लेखणीच्या बळावर प्रकाशझोत टाकणे या कार्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

‘आदर्श पुरस्कार’ स्विकारताना भावनिक होत भगत म्हणाले, हा पुरस्कार माझ्या कार्याला अधिक जोम देईल आणि समाजहितासाठी पुढेही लेखणीची धार कायम राहील. त्यांच्या या गौरवाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपूर्ण कार्यक्रमात उद्योग चित्रपटाचे प्रदर्शनही झाले. पत्रकारिता व समाजसेवेतील योगदानासाठी फुलचंद भगत यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची राज्यस्तरीय पातळीवर झालेली दखल असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. या भव्य सोहळ्यात मिळालेला ‘आदर्श पुरस्कार’ हा पत्रकार फुलचंद भगत यांच्या निर्भीड कार्याची व सामाजिक बांधिलकीची पावती ठरला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही