म्हैसाळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी सचिन कांबळेंनाच? ; आ. जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने बोलवाड येथे आयोजित संवाद मेळावा व विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटासाठी सचिन कांबळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, ईश्वरपूरचे आमदार व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. जयंत पाटील यांच्या शुभहस्ते सुमारे ६५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक नेते मनोज बाबा शिंदे होते. यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर (वास्कर) आप्पा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत, महिला तालुकाध्यक्ष, युवती तालुका अध्यक्षा कदम मॅडम यांच्यासह बोलवाड व मिरज तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. जयंत पाटील यांनी सचिन कांबळे यांच्या कार्यशैलीचे आणि नेतृत्वगुणांचे खुलेपणाने कौतुक केले. सचिन कांबळे हे जिद्दी, कणखर आणि सातत्याने विकासासाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व आहे. गावाने व कार्यकर्त्यांनी एकमताने त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास त्यांना पुढील जबाबदारी देण्याचे बळ आम्हालाही मिळेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यासोबतच आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रितपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सचिन कांबळे म्हणाले की, २००७ पासून बोलवाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा सुरू आहे. लोकसंख्येने लहान असले तरी बोलवाड हे तालुका व जिल्ह्याच्या नकाशावर आदर्श गाव म्हणून ओळखले जावे, या उद्देशाने ग्रामपंचायत, सर्व सदस्य व सहकाऱ्यांच्या मदतीने रस्ते, बंदिस्त गटारे, वसाहतीतील मूलभूत सुविधा, पेव्हिंग ब्लॉक आदी अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत.
आपल्या राजकीय प्रवासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आंबेडकरी चळवळीत काम करताना बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने उभारली आणि ती यशस्वी केली. मात्र, गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत राजकीय पाठबळ आवश्यक असल्याने मनोज बाबा शिंदे आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून, त्या जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातून पहिला मागणी अर्ज दाखल केल्याचे सचिन कांबळे यांनी स्पष्ट केले. पक्षाने संधी दिल्यास, भाजपकडील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यात माता रमाई कॉलनी, संत रोहिदास कॉलनी, पद्मावती नगर, जमादार प्लॉट, बेघर वस्ती आदी भागांतील काँक्रीट रस्ते, बंदिस्त गटारे व पेव्हिंग ब्लॉकची विकासकामे समाविष्ट होती.

एकूणच, बोलवाडमधील हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेससाठी शक्तिप्रदर्शन ठरला असून, म्हैसाळ जिल्हा परिषद गटासाठी सचिन कांबळेंची उमेदवारी मजबूत झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.