राष्ट्रवादी गटातील बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई नाराज ; गेल्या तीन पिढ्यांचे “राजकीय मतभेद” वाढणार की मिटणार?

LiVE NEWS | UPDATE
महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी मंगळवारी (१० जून) सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटणचे आमदार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे सत्यजित पाटणकर यांच्या सोबत गेल्या चार दशकांपासून टोकाचे राजकीय मतभेद आहेत. कट्टर विरोधकांचे भाजप पक्षात येणे हे महायुतीच्या काही नेत्यांना आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळे मित्र पक्षात प्रचंड नाराजीचे सुर उमटत आहेत. या संदर्भात शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. यावेळी ते नाराज असल्याचेही दिसून आले आहे.
शंभूराज देसाई यांनी बुधवारी एबीपी माझा या वाहिनीसोबत बोलताना सांगितले की ”यावर आम्ही बोलणं योग्य नाही. आम्ही आमचं काम करतोय. गेल्या अडीज वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि गेले सहा महीने फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. यावेळी आम्ही महायुतीमध्ये असताना महायुती म्हणूनच सगळीकडे काम केलं आहे. ज्या जबाबदाऱ्या आमच्यावर मंत्री म्हणून दिल्या त्या-त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केल्या आहेत.”
पुढे ते म्हणाले, ”आमच्या विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांच्या बद्दल जे काही बोलायच आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार आहे. दोघांचीही भेटीसाठी वेळ मागितलेली आहे. त्यांनी वेळ दिल्यावर माझं मत मी त्यांच्या समोर मांडेन.”
मा. शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर आणि त्यांच्यामध्ये असलेल्या राजकीय मतभेदाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १९८० मध्ये दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या आयुष्यातील शेवटची विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांनी बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. तेव्हापासून आमचं ‘वैर’ म्हणता येणार नाही, पण राजकीय मतभेद जवळपास ४५ वर्षांपासून आहेत. म्हणजेच तीन पिढ्यांचे राजकीय मतभेद आहेत.
पुढे देसाई म्हणाले, आता अशा राजकीय मतभेद असणाऱ्या नेत्यांचा महायुतीतल्या मोठ्या पक्षामध्ये प्रवेश काल झाला आहे. मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. त्यामुळे मला जे बोलायचे ते मी त्यांच्याशी बोलेन. वेळ मिळाल्यावर माझं मत मांडेन. त्यांच्याशी भेट झाल्यानंतर आवश्यकता वाटली तर, मी माध्यमांशी बोलेन.