महाराष्ट्रराजकीय

विकासासाठी परिवर्तनाची हाक ; सणबुर गणात संपदा जाधवांना संधी द्या ; मनीषा पाटील

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

पाटण | सणबुर पंचायत समिती गणातील विकासाची गाडी वर्षानुवर्षे जागेवरच घुटमळत असल्याने आता मतदारांनीच क्रांती घडवावी, असा थेट सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संपदा संदीप जाधव यांना निवडून देण्याचे जोरदार आवाहन मनीषा प्रकाश पाटील यांनी केले. प्रस्थापितांच्या गलिच्छ राजकारणाला आता आवर घालण्याची वेळ आली आहे. पैसा आणि मनगटी ताकदीच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, असा सणसणीत हल्लाबोल त्यांनी केला.

मनीषा पाटील म्हणाल्या की, आमचे कुटुंब गेली चाळीस वर्षे समाजकार्यात सक्रिय आहे. कधीही प्रसिद्धीचा डंका वाजवला नाही. मात्र आजच्या राजकारणात पैसा सर्वश्रेष्ठ ठरत असेल, तर सामान्य माणसाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. ‘पैसा आहे तो प्यार, नाही तर सगळं व्यर्थ’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावाचा, प्रभागाचा खरा विकास हवा असेल तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून देणे हाच एकमेव मार्ग आहे.

महिला राजकारणावर भाष्य करताना त्यांनी अनेकांची पोलखोल केली. निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या नावावर सत्ता असते, पण प्रत्यक्ष कारभार पती किंवा नातेवाईक पाहतात. महिला केवळ स्वाक्षऱ्यांची धनी राहतात. मात्र संपदा जाधव या अपवाद ठरणार आहेत. त्या उच्चशिक्षित, सक्षम आणि स्वतंत्र निर्णय घेणाऱ्या उमेदवार आहेत. पंचायत समितीत निवडून आल्यानंतर त्यांच्या कामकाजात कुठल्याही नातेवाईकांचा हस्तक्षेप होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ता कुणाचीही असो, विकासासाठीचा निधी येतच असतो, असे सांगत त्यांनी विकासाच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीवरही घणाघाती टीका केली. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या जशा मूलभूत गरजा आहेत, तशाच रस्ते, वीज, पाणी या प्रभागाच्या मूलभूत समस्या आहेत. मात्र आजही या समस्या जैसे थे आहेत. कोट्यवधींच्या विकासकामांचे दावे केले जातात, पण विकास कुठेच दिसत नाही. मंदिरांचा विकास म्हणजेच शहर, जिल्हा आणि ग्रामीण भागाचा विकास का? कुठे, किती आणि कोणत्या कामासाठी पैसा खर्च झाला, याचा जाहीर हिशेब जनतेसमोर कधी येणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सद्यस्थितीत सणबुर गणात गलिच्छ राजकारणाचा उन्माद सुरू असून सत्तेची नशा घातक ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुडाच्या राजकारणात गावाची गळचेपी झाली आहे. तरुण पिढीला गटातटाच्या राजकारणात बाजूला सारले जात आहे. या राजकारणावर जनतेचा विश्वास उरलेला नाही, असे त्यांनी ठणकावले.

शेवटी मनीषा पाटील यांनी थेट आवाहन केले, तात्पुरत्या गरजांसाठी वर्षानुवर्षे नतमस्तक व्हायचे का? आजवर निवडून आलेल्यांनी किती निधी आणला, कुठे खर्च केला याचा अहवाल कधी दिला का? आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आली आहे. नव्या पर्वाचा उदय करा. प्रस्थापितांना थांबवा आणि सणबुर गणाच्या खऱ्या विकासासाठी काम करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार, सौ. संपदा संदीप जाधव यांना विजयी करा, असे आवाहन मनीषा पाटील यांनी केले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही