
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट बंड पुकारले आहे. “शिक्षक नाही, शिकवण नाही” या परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समितीच्या शिक्षण विभागातच शाळा भरवून प्रशासनाला जाग आणली. या अभूतपूर्व घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ माजली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही तातडीने धाव घ्यावी लागली.

मंगळसा शाळेत तब्बल पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी, शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. दिवसेंदिवस शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला. त्यांनी ही समस्या पालकांना सांगितली, पालकांनीसुद्धा वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देऊन प्रशासनाला समस्येची जाणीव करून दिली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनीच अनोखा निर्णय घेतला. थेट पंचायत समिती मंगरुळपीरच्या शिक्षण विभागातच शाळा भरवली.
विद्यार्थ्यांच्या या कृतीने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यातच गटशिक्षणाधिकारी मिटिंगसाठी बाहेर गेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना काय सांगायचे, हा प्रश्नच उपस्थित झाला. काही वेळातच या घटनेची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी मिटिंग संपताच तात्काळ कार्यालयात येऊन विद्यार्थ्यांशी व पालकांशी थेट संवाद साधला. तक्रारी ऐकून त्यांनी गैरहजर असलेल्या शिक्षिकेला तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले तसेच पुढील काळात अशा तक्रारी पुन्हा येणार नाहीत, अशी कडक ताकीदही दिली.
विद्यार्थ्यांचा विकास आणि शिक्षण हेच आमचे प्राधान्य आहे. कोणतीही अडचण सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे गटशिक्षणाधिकारी माने यांनी स्पष्ट सांगितले.
या घटनेने शिक्षण विभागाचे खरे स्वरूप उघड केले आहे. प्रशासनाच्या उदासिनतेचा सामना करत विद्यार्थ्यांनी स्वतःहून आंदोलन उभे करून ‘शिकण्याचा हक्क’ दाखवून दिला आहे. त्यांच्या धाडसामुळे अखेर शिक्षण विभागाला जाग आली आहे. आता मंगळसाच्या विद्यार्थ्यांच्या या लढ्यामुळे इतर शाळांमधील समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.