कृषी जगतविदर्भ

मुख्यमंत्री साहेब शेतीला किमान दिवसा लाईट द्या हो ; संतप्त शेतकऱ्यांची मागणी

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी सध्या अक्षरशः जीव मुठीत धरून शेती करत आहेत. एकीकडे रब्बी हंगामाची धामधूम, तर दुसरीकडे रात्रीची सक्तीची वीज, बिबट्यासह हिंस्र वन्यप्राण्यांचा धोका आणि प्रशासनाची उदासीनता या सगळ्यांच्या कचाट्यात शेतकरी होरपळून निघत आहे. “मुख्यमंत्री साहेब, शेतीला किमान दिवसा लाईट द्या हो” अशी जळजळीत हाक आता मंगरुळपीर तालुक्यातून थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील काही भागांत बिबट्यांचा वावर असल्याची जोरदार चर्चा आहे. रात्रीच्या अंधारात शेतात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तरीही वनविभागाकडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री पाणी देताना शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेक वेळा जीव धोक्यात घालावा लागत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

राज्य शासनाने शेतीसाठी दिवसा वीज देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असतानाही प्रत्यक्षात मात्र महावितरणकडून रात्रीचीच वीज दिली जात आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार रात्री दहा-बारा वाजल्यानंतर शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. या वेळेत शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत, अंधारात, हिंस्र प्राण्यांच्या भीतीखाली पिकांना पाणी द्यावे लागते. हा अन्याय नाही तर काय?

रब्बी हंगामातील हरभरा, गहू, भाजीपाला यांसारख्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना रात्री जागून काढावे लागत आहे. दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री शेतात जाणे शेतकऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडचे आहे. एखाद्या डीपीमध्ये बिघाड झाला तर रात्री कोणीही उपलब्ध नसते. अशावेळी शेतकरी स्वतःच जीव धोक्यात घालून डीपीकडे जातात. सर्पदंश, विंचूदंश, प्राण्यांचे हल्ले यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग ओढवतात.

“कोणताही राजकीय नेता किंवा शासकीय अधिकारी आठ तासांपेक्षा अधिक काम करत नाही. मात्र शेतकरी दिवसभर राबूनही रात्री पिकाला पाणी द्यायला जातो. शेतकरी माणूस नाही का?” असा थेट सवाल आता शेतकरी विचारत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या जगण्याचा विचार करावा, त्यांना दिवसा किमान १२ तास वीज पुरवठा करावा, हीच एकमुखी मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर “मुख्यमंत्री साहेब, शेतीला किमान दिवसा लाईट द्या ओ!” हा भावनिक संदेश व्हायरल होत आहे. मंगरुळपीरसह संपूर्ण तालुक्यातील शेतकरी मुख्यमंत्री याकडे लक्ष घालतील आणि तातडीचा निर्णय घेतील, या आशेवर आहेत.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही