हदगावात अधिकारी गायब ; मुख्यालय सोडून ‘सोयीचे वास्तव’ ; योजनांचा कागदी पसारा ; नागरिकांचे काम ठप्प

LiVE NEWS | UPDATE
नांदेड | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
हदगाव प्रतिनिधी | हदगाव पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी न राहता ‘आपल्या मनाने’ फिरत असल्याने सर्वसामान्यांची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. शासन गावापासून दिल्लीपर्यंत लाखो रुपये खर्च करून योजना राबवते; पण त्या योजना कागदावरच शोभा वाढवत बसल्या आहेत. कारण मुख्यालयात अधिकारीच नाहीत. मग काम कोण करणार?
ग्रामविकासाचा कणा मानला जाणारा ग्रामसेवकच मुख्यालयी नसल्याने जनतेचा संताप टोकाला पोहोचला आहे. एका ग्रामसेवकावर दोन-तीन गावांची जबाबदारी. वरती “मी मिटिंगला आहे”, “दुसऱ्या गावात आहे” अशा कारणांची तोफ. परिणाम गावकऱ्यांची कामे महिनोन्महिने अडकून धुळ खात पडलेली. विकासाचा रेटा काय म्हणा? कागदावर हजारो योजनांची फुले, प्रत्यक्षात मात्र काटेरी रान.
याचाच फायदा घेत ग्रामपंचायतींमध्ये राजकीय गटबाजी बोकाळली आहे. विकासकामांचा दर्जा घसरून तळात. नागरिकांना आपलेच हक्काचे काम करून घेण्यासाठी वशिला लावावा लागत आहे. पंचायत समितीच्या गटविकास कार्यालयासह बांधकाम, कृषी, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, महिला-बालविकास, रोहयो असा एकही विभाग नाही जिथे कर्मचारी नियमित सापडतात. निवडणुकीच्या उंबरठ्यावर उमेदवार कागदपत्रांसाठी फेऱ्या मारतायत, पण अधिकारी मात्र गायब.
ही बेफिकीर तडफड आता जनतेने थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या दारात नेऊन ठेवली आहे. “सीईओनी अचानक धडक द्यावी, कार्यालये झाडून काढावीत अचानक भेट देऊन वास्तव परिस्थितीची पाहणी केल्यास अधिकारी-कर्मचार्यांचा शिस्तभंग उघड होईल, अशी जनतेची जोरदार मागणी आहे. गावोगावी एकच प्रश्न “आमचा ग्रामसेवक कोण? विस्तार अधिकारी कुठे आहेत?
हदगावातील नागरिक आता कर्तव्यदक्ष, जबाबदार प्रशासनाच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात हजर राहिले तरच विकासाचा मार्ग सुकर होईल, नाहीतर हदगावातील योजनांचे भविष्य याच बेपत्ता अधिकाऱ्यांच्या मागेच हरवून जाईल.