विदर्भ

हिरकणी कक्षालाच टाळे; परिवहन विभागाचा बेजबाबदारपणा

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकांवर सुरू केलेला ‘हिरकणी कक्ष’ हा उपक्रम मंगरुळपीर बसस्थानकात मात्र नावालाच उरल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रवासी स्तनदा मातांसाठी उभारलेला हा कक्ष बहुतांश वेळा कुलूपबंद असल्याने महिलांना उघड्यावर स्तनपान करावे लागत असून, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मातांची कुचंबणा होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक स्तनपान करता यावे, या उद्देशाने ‘हिरकणी कक्ष’ ही योजना राबवली. मंगरुळपीर बसस्थानकातही नियंत्रण कक्षाशेजारी या हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात या कक्षाचा उपयोग झाला. मात्र कालांतराने या कक्षाकडे दुर्लक्ष झाले असून सध्या तो कायमस्वरूपी कुलूपबंद असल्याचे चित्र आहे.

महायुतीच्या शिंदे सरकारने महिलांना एसटी बसभाड्यात ५० टक्के सवलत दिल्याने ग्रामीण भागासह शहरातून मोठ्या प्रमाणावर महिला एसटीने प्रवास करीत आहेत. यामध्ये लेकुरवाळ्या, स्तनदा मातांची संख्या लक्षणीय आहे. बसस्थानकावरील गर्दी, सततचा गोंगाट, लाऊडस्पीकरवरील घोषणा, वाहनांचे कर्कश हॉर्न यामुळे लहान बाळे अस्वस्थ होतात. अशा वेळी बाळ रडू लागल्यास मातांना स्तनपान देणे अपरिहार्य ठरते. मात्र हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलांना उघड्यावरच स्तनपान करावे लागत आहे. परिणामी अनेक महिलांना लाजिरवाणी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे अनेक महिलांना बसस्थानकात हिरकणी कक्ष आहे, याची माहितीच नसल्याचे दिसून आले आहे. माहिती असलेल्या महिलांनाही कक्ष बंद असल्याने अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारणा करण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे शासनाच्या महिलाभिमुख धोरणाचा अपेक्षित लाभच महिलांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे.

हिरकणी कक्षाचा मूळ उद्देश लक्षात घेता, तो कायमस्वरूपी सुरू ठेवणे आवश्यक असताना ‘मागणी केल्यावरच कक्ष उघडणे’ ही भूमिका प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक असल्याची टीका होत आहे. मातांनी चावी मागावी, अधिकारी उपलब्ध असावा आणि तेव्हाच कक्ष उघडावा, ही प्रक्रिया महिलांच्या सन्मानाला धरून आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत आगारप्रमुख संदिप पवार यांच्याशी संपर्क साधला असता, “मंगरुळपीर बसस्थानकातील हिरकणी कक्षाची चावी नियंत्रण कक्षात ठेवण्यात आली आहे. स्तनदा मातांनी मागणी केल्यास कक्ष उघडून दिला जातो. सध्या वापर कमी असल्याने कक्ष बंद ठेवण्यात आला आहे. पुढील काळात हिरकणी कक्षाबाबत सूचना फलक लावण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी सुरू केलेल्या योजनेची अशी अवस्था असल्याने सामाजिक स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. हिरकणी कक्ष कायमस्वरूपी सुरू ठेवावा, त्याबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना यासंदर्भात संवेदनशील बनवावे, अशी जोरदार मागणी प्रवासी महिलांकडून होत आहे. अन्यथा महिलाभिमुख योजना केवळ कागदावरच शोभून दिसतील, असा इशाराही दिला जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही