हॉकीपटूपासून पोलीस पदापर्यंत – निरजला शिंदेचा प्रेरणादायी प्रवास
गरीबी, संघर्ष आणि सामाजिक कार्यातून उमललेले यश
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील चरई गावाचे रहिवासी पांडुरंग शिंदे हे नाव आज सगळीकडे अभिमानाने घेतले जात आहे. त्यांच्या मुलीने, निरजला शिंदे हिने काल शपथविधी करून महाराष्ट्र पोलिस म्हणून रुजू होऊन आपल्या गावचे, कुटुंबाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
निरजला ही लहानपणापासूनच अभ्यासू आणि क्रीडाप्रेमी मुलगी होती. ती दुसऱ्या इयत्तेत असताना घर सोडून शासनमान्य वसतिगृहात राहत शिक्षण घेतले. क्रीडा क्षेत्रात तीने महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळाडू म्हणून आपली छाप पाडली. लहानशा खेडेगावातील एका गरीब कुटुंबातील मुलगी एवढ्या मोठ्या स्तरावर पोहचली हे खरंच प्रेरणादायी आहे.
निरजला हिच्या यशामागे तिचे वडील पांडुरंग शिंदे यांचे अपार कष्ट आणि त्याग आहे. छोट्या हॉटेलमध्ये ग्राहक सेवा देणाऱ्या पदावर ते काम करतात. नोकरी छोटी असली तरी समाजकार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आपल्या मुलीचे करिअर घडवण्यासाठी त्यांनी कष्टाचे सोने केले. समाजकार्य आणि मेहनत हेच त्यांचे ब्रीद असून गावात आपले नाव वेगळे करून ठेवले आहे.
तसेच निरजलाच्या यशात तिचे रा. जी. प. शिक्षक श्री. धनंजय पवार यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे रा. जी. प. शिक्षक श्री. पाटील सर (तळा) यांचेही मोठे सहकार्य तिला लाभले. कुटुंबाकडून मिळालेल्या आधारात आजी श्रीमती चंद्राबाई बाळाराम शिंदे आणि आजोबा श्री. बाळाराम शिंदे यांचे प्रेम, पाठबळ आणि सततची प्रेरणा हाही तिच्या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला आहे.
आज निरजला पोलिस बनली आहे, ही केवळ तिचीच नाही तर संपूर्ण शिंदे कुटुंबाची, चरई गावाची आणि रायगड जिल्ह्याची शान आहे. पांडुरंग शिंदे यांचा त्याग, कष्ट आणि समाजसेवा या सर्व गोष्टींमुळे हे यश अधिक गोड झाले आहे.
निरजला हिच्या पोलिस पदावर नियुक्तीने अनेक गरीब व सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. “मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते” हे या कुटुंबाने दाखवून दिले आहे.
चरई गावातून उभी राहिलेली ही प्रेरणादायी कथा नक्कीच पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरेल. ✨
