शि. द. पाटील शिक्षक संघ मोठ्या ताकदीने मोर्चात सहभागी होणार – जिल्हाध्यक्ष अमोल माने
मोर्चाच्या अनुषंगाने झाली शिक्षक संघाची आभासी सभा संपन्न

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
सध्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात प्राथमिक शिक्षकांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून त्या नाराजीच उग्र स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक वाडी वस्तीवर असणाऱ्या गुरुजींनी १८ सप्टेंबर २०२४ पासून शाळेमध्ये काम करताना काळ्याफिती लावून शासनाचा निषेध व्यक्त करत सर्व प्रशासकीय ग्रुप मधून बाहेर पडून असहकाराची भूमिका घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यामध्येही शि.द.पाटील शिक्षक संघाच्या वतीने तालुका निहाय पदाधिकाऱ्यांची आभासी बैठक घेऊन या आंदोलनामध्ये १००% शिक्षकांना सहभागी होण्यासाठीचे आवाहन शिक्षक संघाच्यावतीने केले असून शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या ताकदीने या २५ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या भव्य मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल माने व सरचिटणीस राहुल पाटणे यांनी दिली.
१५ मार्च २०२४ व ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय बहुजनांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आणणारे शासन निर्णय असून या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यस्तरावर सर्व संघटना एकत्रित येत २५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये एक दिवस रजा काढून संपूर्ण शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांच्या समन्वय समितीला राज्यस्तरावरून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्येही समन्वय समितीच्या माध्यमातून २५ सप्टेंबर २०२४ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग चौक सांगली या ठिकाणाहून सकाळी ११:०० वाजता मोर्चाला सुरुवात होऊन तो शांततेत व शिस्तीचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व शिक्षक एकत्र येऊन सभा झाल्यानंतर समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. या भव्य दिव्य मोर्चामध्ये शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद शिक्षक बंधू – भगिनी मोठ्या ताकदीने उतरणार असून प्रत्येक तालुक्यात केंद्रनिहाय शिक्षकांच्या भेटीचे नियोजन शिक्षक संघाच्या वतीने केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनी एक दिवस रजा टाकून मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल माने व सरचिटणीस राहुल पाटणे यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती देवडकर , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा करुणा मोहिते ,जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, प्रतापराव गायकवाड,नंदकुमार कुटे, राजाराम केंगार ,संतोष गुरव, प्रवक्ते उत्तम पाटील, तालुका अध्यक्ष कृष्णा सावंत, धनाजी माने, बाळू गायकवाड, विजय साळुंखे,भारत शिरसागर, यशवंत गोडसे, धनाजी साळुंखे, संजय खरात, बिना माने,भीमराव पवार, सत्यजित यादव, जैनुद्दीन नदाफ, मोहम्मद अली जमादार, मंदाकिनी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.