गावोगावी दर्जेदार आरोग्यसेवा ; रुग्णसेवा म्हणजेच देवसेवा ; पालकमंत्री भरणे
रिठदला नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण; जिल्ह्यातील 10 उपकेंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

LiVE | NEWS UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
रिसोड | गोरगरीब व गरजूंना वेळेवर उपचार मिळणे हीच खरी आरोग्य व्यवस्थेची कास आहे. रुग्णांची सेवा म्हणजेच देवसेवा, असा ठाम संदेश देत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी रिठद येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केले. या सोहळ्यात जिल्ह्यातील आणखी 10 उपप्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामुळे ग्रामीण जनतेला गावातच दर्जेदार व तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
रिठद येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी आमदार किरणराव सरनाईक, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, सरपंच पंचफुला अंभोरे, कृषी सभापती वैभव सरनाईक, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ उपचारासाठी नसून, रोगप्रतिबंध, जनजागृती आणि वेळेवर निदानासाठीही महत्त्वाची ठरतात. कोवीड काळात आरोग्य यंत्रणेने दिलेला लढा कौतुकास्पद होता. पुढेही शासन गावोगावी सक्षम आरोग्य सुविधा पोहोचवण्यास कटिबद्ध आहे.
या केंद्रांचा समावेश
ऑनलाईन उद्घाटनात वाशिम तालुक्यातील शेलू बु, वारा जहाँगीर, कळंबा महाली, पिंपळगाव, रिसोड तालुक्यातील चिचंबाभर, भौरद, मानोरा तालुक्यातील फुलउमरी, मंगरूळपीर तालुक्यातील पोटी, कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगीर आणि धनज खूर्द या केंद्रांचा समावेश आहे.
ग्रामीण आरोग्य सेवेला बळ
मान्यवरांनी नव्या इमारती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सेवा, स्वच्छ आणि सुसज्ज रुग्णालय यामुळे गावातच वेळेवर उपचार मिळणार असल्याचे सांगितले. नव्याने सुरू झालेल्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि पोहोच दोन्ही वाढणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल काळे यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.