क्राईमगुन्हे विश्व्मराठवाडा

तक्रार देताच प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक ; २ बोटी नष्ट, ५-६ जणांवर गुन्हे दाखल

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या इशाऱ्याला प्रशासनाने दिला झटपट प्रतिसाद ; वाळू माफियांमध्ये खळबळ

संभाजीनगर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत धडक दिली. तक्रारीनंतर काही तासांतच प्रशासनाने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत दोन बोटी पूर्णतः नष्ट केल्या. पाच ते सहा अज्ञात आरोपींवर औराद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंदाजे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तक्रार, उपोषणाचा इशारा आणि धडाकेबाज कारवाई…
निलंगा तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, १५ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. समितीच्या या कठोर भूमिकेनंतर प्रशासन हलले आणि त्वरित हालचाल करत महसूल व पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवली.

विशेष पथकाची नदीपात्रात धडक…
९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने औराद परिसरातील तेरणा नदीपात्र गाठले. महसूल अधिकारी, पोलिस व तलाठी वर्गासह स्थानिक मच्छिमारांची मदत घेऊन बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दोन लोखंडी कढई बोटी बाहेर काढण्यात आल्या. तत्काळ वेल्डिंग करून त्या पूर्णतः नष्ट करण्यात आल्या. या धाडसी कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात तणावाचे वातावरण होते.

कारवाईचा तपशील :

👉🏻 २ लोखंडी बोटी जप्त करून नष्ट
👉🏻 ५ ते ६ अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल
👉🏻 ६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
👉🏻 महसूल-पोलिसांची संयुक्त मोहीम

अधिकाऱ्यांचा सहभाग…
कारवाईदरम्यान तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, मंडळ अधिकारी आर.व्ही. देशमुख, राजकुमार सोमवंशी, भरत मुंडे, तलाठी वर्ग आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कारवाई प्रशासनाची गंभीरता दाखवणारी ठरली.

तपास सुरूच…
मंडळ अधिकारी भरत मुंडे यांच्या फिर्यादीवरून औराद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे. या ऑपरेशनमुळे वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून, अवैध वाळू उपसा खपवून घेतला जाणार नाही, हा ठोस संदेश प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांत समाधान, माफियांत खळबळ…
ही कारवाई होताच स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. मात्र, वाळू माफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे. तक्रार व उपोषणाच्या इशाऱ्यामुळेच ही कारवाई झाली, अशी चर्चा गावोगाव रंगली आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या कठोर भूमिकेमुळे प्रशासनाला जाग आली, हे स्पष्ट झाले आहे.

नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधातील ही कारवाई एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ ठरली असून, यापुढे अशा गुन्हेगारीला आश्रय मिळणार नाही, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही