LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याजवळ असलेल्या ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्ग’ या नामफलकाच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नामफलकावर धूळ व माती साचली असून फलकावरील अक्षरेही फिकट आणि अस्पष्ट झाल्याने नागरिकांना मार्गाचे नाव स्पष्टपणे दिसत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच नामफलकाच्या परिसरात कचरा व अस्वच्छता निर्माण झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मिरज-महापालिका तथा सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्ग’ या नामफलकाची तातडीने दुरुस्ती अथवा नवीन नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. नामफलकाचे सुशोभीकरण, रंगरंगोटी करून अक्षरे स्पष्ट व उठावदार करावीत, तसेच परिसरातील कचरा व घाण तातडीने हटवून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याजवळील हा नामफलक सध्या जीर्ण आणि दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नामफलकावर धूळ-माती साचल्यामुळे त्याचे स्वरूप खराब झाले असून अक्षरे अस्पष्ट झाल्याने नागरिकांना नामफलक वाचण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. नामफलकाच्या खालील भागात कचरा व अस्वच्छता निर्माण झाल्याने सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याशी संबंधित असून महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या मार्गाचा नामफलक अशा अवस्थेत राहणे ही बाब गंभीर असल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता नामफलकाचे नूतनीकरण व परिसराचे आवश्यक सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी. नामफलकाची दुरुस्ती किंवा नवीन फलक बसविण्यासोबतच परिसरात नियमित स्वच्छता राखण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात आणि भविष्यात कचरा साचू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या आठ दिवसांत सर्वपक्षीय, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आम्ही आंबेडकरवादी’ संघटनांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन व घेराव करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी विश्वास खांडेकर, सचिन मोरे, सागर आवळे, जयंत मगरे, प्रमोद इनामदार, सूरज व्हनाळे, अविनाश भोरे, अंकुश आवळे, मनोज गुडीमनी, रवींद्र केंगार आणि सोमनाथ कांबळे उपस्थित होते.

