पवारांनी सात दिल्या, भाजपने शून्य ; १२ वर्षांच्या साथीनंतरही पदरी ठेंगा ; आठवलेंची जाहीर खंत
LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महायुतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषद, मंत्रिपद, लोकसभा-विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महायुतीतील मोठ्या पक्षांना स्पष्ट संदेश दिला. आमचा पक्ष लहान असला तरी आम्हाला सत्तेत वाटा मिळालाच पाहिजे. विधान परिषदेची किमान एक जागा तरी द्यावी, अशी मागणी आठवले यांनी केली.
आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित राजकीय शक्ती उभी करण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले नाहीत, सर्व समाजघटक पक्षासोबत जोडले गेले नाहीत आणि सर्वधर्मीयांचा व्यापक सहभागही वाढलेला नाही. सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येऊन काम केले, तर राजकीय ताकद निश्चितच वाढू शकते; मात्र प्रत्यक्षात तसे घडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकजुटीचा संदर्भ देताना आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराची आठवण करून दिली. २०१२ मध्ये एकत्र येऊन महायुती केली होती. शरद पवार यांच्यासोबत असताना रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा मिळाल्या होत्या. मात्र, २०१४ पासून भाजपसोबत असूनही विधान परिषदेची एकही जागा मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत एकही जागा नाही, विधानसभा निवडणुकीतही प्रतिनिधित्व नाही, मुंबई महापालिकेतही जागा नाहीत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ‘आमच्यावर अन्याय होतोय, असे म्हणायचे नाही पण महायुतीतील मोठ्या पक्षांनी आमच्या पक्षाला न्याय देत सत्तेचा वाटा दिला पाहिजे, असे आठवले म्हणाले.
कार्यकर्त्यांनी केवळ मित्रपक्षांवर अवलंबून न राहता स्वतःची संघटनात्मक ताकद वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, महायुतीतील राजकीय भागीदारी केवळ निवडणुकीपुरती न राहता सत्तेतील सहभागातही दिसली पाहिजे, असा त्यांचा सूर होता.
दरम्यान, निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरही आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली. आयोगाविरोधातील आंदोलन योग्य नसल्याचे सांगतानाच मतदार याद्यांमधून अनेकांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारींची दखल घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिजित दीपके यांच्याबाबत बोलताना आठवले यांनी त्यांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह किंवा शिवराळ भाषा वापरणे टाळावे, असेही त्यांनी म्हटले.
एकीकडे महायुतीशी निष्ठा कायम ठेवण्याची भूमिका, तर दुसरीकडे सत्तेतील वाट्यासाठी जाहीर मागणी आठवले यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांच्या राजकीय भागीदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता विधान परिषदेच्या एका जागेची मागणी महायुतीतील नेतृत्व कितपत गांभीर्याने घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
