क्राईमविदर्भ

कोरे चेक, कोरे स्टॅम्प अन् काळा धंदा थांबविला ; वाशिममध्ये सहकार विभागाने हातोडा चालविला

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम जिल्ह्यात अवैध सावकारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने मोठी आणि धाडसी कारवाई करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. वाशिम शहर व तालुक्यातील कवीत परिसरात सुरू असलेल्या अवैध सावकारी व्यवहारांबाबत महेश गुरुमुखदास रामवाणी (रा. सिंधी कॅम्प, वाशिम) व राम सत्यनारायण यादव (रा. शुक्रवार पेठ, वाशिम) यांनी सहकार विभागाकडे दाखल केलेल्या दोन तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सहकार विभागाच्या आठ पथकांनी एकाच वेळी सात ठिकाणी झडती घातली. या झडतीदरम्यान अवैध आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावे हाती लागले असून पुढील चौकशीस वेग आला आहे.

झडतीची कारवाई संतोष विहार, गुरुवार बाजार वाशिम, अग्रसेन भवन वाशिम तसेच मु. पो. खरोळा ता. जि. वाशिम या ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत गिरधारीलाल जगन्नाथ अग्रवाल, मारोती विठ्ठल ठाकरे, सुरज बालू सातपुते, स्वप्नील राजेश इंगोले, अजय प्रकाश इंगळे, राहुल उर्फ बंटी प्रकाश सिरसाट व वाजीद खान समशेर खान अशा एकूण सात गैरअर्जदारांच्या निवासस्थानी व व्यवसायाच्या ठिकाणी झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान अवैध सावकारी व्यवसायाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये आर्थिक व्यवहारांचा उल्लेख असलेल्या रोकडवह्या, खतावणी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेची खरेदीखते, इसारचिठ्ठ्या आदींचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आली असून त्याआधारे पुढील सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार विभागाचे ८ पथक तैनात करण्यात आले होते. श्री. रवि व्ही. आकुलवार, श्री. रविंद्र आर. सावंत, श्री. जयंत एस. सहारे, श्री. महेश कच्छवे, श्री. पाराशर टी. सरकटे, श्री. गजानन पी. फाटे, श्री. राहुल उ. ओईबे व श्री. पी. आर. वाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सहकार प्रशासन व लेखापरीक्षण विभागातील एकूण ३८ कर्मचारी सहभागी होते. तसेच पंच म्हणून महसूल विभागातील तहसीलदार वाशिम यांच्या अधिनस्त १६ ग्राम महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

झडती पथकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमधील १६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी योगेशकुमार कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन व जिल्हा निबंधक (सावकारी) गितेशचंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, जिल्ह्यातील अवैध सावकारांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले असून संबंधित तालुका सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था वाशिम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही