निवडणूक रणघुमाळमहाराष्ट्रराजकीय

पाच वर्षे गायब, निवडणुकीत हजर ; चिरीमिरीवाल्यांना धडा शिकवा ; शंभूराज देसाई

पाटण | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत डोंगरी भागातून थेट रणशिंग फुंकत पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मा. शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पाच वर्षांतून एकदाच मतदारांच्या दारात येऊन चिरीमिरी देत मते मागणाऱ्यांना डोंगरी जनतेची खरी ताकद काय असते, हे यावेळी मतपेटीतून दाखवा, असे कडक आवाहन त्यांनी केले.

पाटण तालुक्यातील मरळी येथील डोंगरी भागातील जाहीर प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून करून घेतला.

मा. शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत डोंगरी भागातील जनतेने एकमुखी पाठिंबा देत मला आमदार केले. तोच विश्वास, तीच ताकद आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. डोंगरी भाग हा नेहमीच विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो काळ आता संपला आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दीड वर्षांत डोंगरी भागातील गावागावांत, वस्त्यावस्त्यांत डांबरी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी खर्च करण्यात आला आहे, असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा ठोस लेखाजोखा मांडला. हे काम कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसते, असे सांगत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

विरोधकांकडे रस्ते विकास खात्याची जबाबदारी असतानाही त्यांनी डोंगरी भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र आता निवडणूक जवळ येताच रात्री-अपरात्री मतदारांची दारे ठोठावून चिरीमिरी देत मतांचा जोगवा मागितला जात आहे. पाच वर्षे कुठे गायब होता? हा सवाल जनतेने विचारलाच पाहिजे, असे ते ठामपणे म्हणाले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख केला. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून माता-भगिनी स्वयंपूर्ण झाल्या आहेत. भावाने बहिणीचा सन्मान राखला आहे, आता बहिणींनीही भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

शेवटी बोलताना मा. शंभूराज देसाई यांनी डोंगरी भागातील सर्व गावांतील मतदारांना सांगितले की, या निवडणुकीत विकासकाम करणाऱ्यांनाच संधी द्या. शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून विरोधकांना जनमताची खरी ताकद काय असते, हे दाखवून द्या. असे थेट आवाहन पालकमंत्री यांनी केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही