बेल्हे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; पोलिसांची ‘डोळेझाक’ की कुंपणच शेत खातंय?

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | जुन्नर तालुक्यातील बेल्हे परिसरात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारीचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. गावाच्या आणि परिसराच्या शांततेवर गदा आणणारे दारू, मटका, ऑनलाईन जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र, एवढे सर्व घडत असताना स्थानिक पोलिस यंत्रणा या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बेल्हे हे गाव जनावरांच्या बाजारासाठी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असल्याने येथे दोन्ही जिल्ह्यांमधून व्यापारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे आर्थिक हालचाली मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र या गर्दीचा फायदा घेत काही जणांनी येथे अवैध धंद्यांचे जाळे उभे केले असल्याचा आरोप होत आहे.
नगर–कल्याण महामार्गालगतच्या काही ठिकाणी अवैध ताडी व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच परिसरातील अनेक धाब्यांवर गावठी आणि बनावट दारूची विक्री सर्रासपणे होत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या बनावट दारूमुळे अनेक युवकांचे जीव धोक्यात आले असून काहींना आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तरीही या अवैध धंद्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे बेल्हे पोलीस ठाण्याच्या आसपासच बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असे प्रकार सुरू असताना त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष कसे होते? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या अवैध धंद्यांना कोणाचा राजाश्रय आहे का? अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर परिसरात मटका आणि ऑनलाईन जुगाराचे अड्डे देखील उघडपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यामध्ये एका पत्रकाराच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच विसावा चौक, श्रीराम चौक आणि पवार वाड्यासमोर मटका व ऑनलाईन जुगाराचे व्यवहार सर्रास सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.
हे सर्व प्रकार स्थानिक पोलिसांना दिसत नाहीत का? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? असा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. काही नागरिक तर उपरोधिक भाषेत “हा विषय संशोधनाचा ठरू शकतो” अशी टीकाही करत आहेत.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात बेल्हे परिसरात परिस्थिती वेगळीच दिसत आहे. त्यामुळे “कुंपणच शेत खात आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेल्हे परिसरातील अवैध दारू, मटका, ऑनलाईन जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर तातडीने कडक कारवाई करून हे अड्डे कायमचे बंद करण्यात यावेत, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.