विदर्भशैक्षणिक

बदलीत कारस्थाने, भरतीत गैरप्रकार ; शिक्षण विभागात माजला भ्रष्टाचार

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

कारंजा येथील नगरपरिषद शिक्षण विभागात प्रचंड सावळागोंधळ उडाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुलजी जेठा उर्दू हायस्कूलमधील पदभरती, बदली, शाळा सोडल्याचे दाखले, नियमबाह्य नेमणुका आणि आर्थिक व्यवहारांवरून थेट गंभीर आरोप झाले आहेत. या भोंगळ कारभाराची पोलखोल शिक्षक जमील शेकुवाले यांनी केली असून, दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढा उभारू असा ठणकावलेला इशाराही त्यांनी दिला आहे.

नियम मोडला ; भ्रष्टाचार जोडला

२२ सप्टेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत शेकुवाले यांनी गंभीर आरोपांची मालिका मांडली. आरटीई कायदा २००९ धाब्यावर बसवून पात्रता नसलेल्या व्यक्तींना अतिथी निदेशक पदावर नेमणूक करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विहित मुदतीनंतर अर्ज केलेल्या उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने फेटाळला तरी पैशाच्या जोरावर त्यालाच नियुक्ती देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

टीसीत फेरफार, नियुक्तीत व्यवहार; विद्यार्थ्यांच्या भविष्यास गालबोट

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदीत म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) मध्ये बेकायदेशीर फेरफार करून थेट गैरव्यवहार झाल्याचे शेकुवाले यांनी स्पष्ट केले. तसेच नियुक्त्या आणि समायोजनांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा त्यांनी केला.

उच्च प्राथमिकवर नियुक्ती, माध्यमिकला शिकवणी ; दहा वर्षांचा शिक्षण घोटाळा उघड

मराठी विषयाची कोणतीही पात्रता नसलेल्या शिक्षकांकडून गेल्या दहा वर्षांपासून नऊवी-दहावीला मराठी शिकवले जात आहे. इतकेच नव्हे तर अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडून त्यांच्याकडे दहावीच्या पेपर तपासणीचे कामदेखील सोपवले गेले. नियुक्ती उच्च प्राथमिकसाठी असूनही माध्यमिक वर्गांना शिकवले जाणे ही मोठी विसंगती असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान शिक्षक? ; शिक्षण विभागात कारभाराचा खेळ

प्रयोगशाळा सहाय्यकाने आपली मर्यादा ओलांडून स्वतःला विज्ञान शिक्षक समजून कामकाज केले, हा प्रकारही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील निष्काळजीपणा आणि संगनमत या सर्व घोटाळ्याला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अनुदानित शाळेतून अनुदानफुल्ल; आर्थिक देवाणघेवाणीतून समायोजन बेकायदेशीर

४० टक्के अनुदानित शाळेतून १०० टक्के अनुदानित शाळेत कोणतीही वैधानिक प्रक्रिया न करता शिक्षकांचे समायोजन झाले. या मागेही आर्थिक व्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय विद्यापीठाचा बीपीएड अभ्यासक्रम परवानगीशिवाय पूर्ण करून पैशांच्या जोरावर पदोन्नती घेतल्याचा आरोप झाला आहे.

दोषींवर कारवाई नाही तर न्यायालयीन लढा ; शिक्षकांचा ठणकावलेला इशारा

हा संपूर्ण घोटाळा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडलेला आहे. नियम मोडून आस्थापना बदलली गेली. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयीन लढा लढू, असा ठणकावलेला इशारा शेकुवाले यांनी दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही