सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील एका डॉक्टरविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर संजय शेळके असे संबंधित डॉक्टरांचे नाव असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट. मनीषा रोटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.
प्राप्त प्रथम माहिती अहवालानुसार, खासदार प्रणितीताई शिंदे यांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 9.04 वाजता फेसबुकवर राजकीय विषयासंदर्भातील पोस्ट प्रसिद्ध केली होती. या पोस्टवर 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता डॉ. सचिनकुमार शेळके यांनी महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला काँग्रेसच्या इस्लामपूर येथील कार्यकर्त्या अॅड. मनीषा चंद्रकांत रोटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित टिप्पणीमुळे महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या टिप्पणीचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
या तक्रारीची दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी 22 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा क्रमांक 0413/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 79 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सोशल मीडियावर राजकीय मतभेद व्यक्त करताना महिलांविषयी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्याच्या प्रकारांबाबत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. “महिलांचा अपमान करणाऱ्या अशा प्रकारांकडे महिला काँग्रेस दुर्लक्ष करणार नाही. महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्यासाठी आम्ही ठामपणे आवाज उठवू. सोशल मीडियावर महिलांविरोधात अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी महिला काँग्रेसचा पाठपुरावा सुरूच राहील,” असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिला.

