सुशोभीकरणाची टाळाटाळ, स्वच्छतेची बोळवण ; बोंबाबोंब आंदोलनाने महापालिकेची उडणार धांदल
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्गाच्या नामफलकाचे नूतनीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ‘आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना, सांगली जिल्हा’ यांच्याकडून करण्यात आला आहे. या मागणीसाठी ४ नोव्हेंबर रोजी महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने केवळ परिसराची स्वच्छता केली मात्र, नामफलकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम अद्याप केलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा ‘बोंबाबोंब’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या मार्गाचा नामफलक सध्या जीर्ण आणि दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. या फलकावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती साचली असून, त्यावरील अक्षरेही अस्पष्ट झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना नामफलकावरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही. सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या मार्गाची अशी अवस्था असणे ही चिंतेची बाब असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


या पार्श्वभूमीवर नामफलकाची दुरुस्ती करण्याऐवजी त्याचे नव्याने नूतनीकरण करावे, फलकावर ठळक आणि सुवाच्य अक्षरांत नामकरण करावे, तसेच चौकातील परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याबरोबरच नामफलकाला सन्मानजनक स्वरूप देणेही आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


निवेदनानंतर महापालिका प्रशासनाकडून परिसराची स्वच्छता करण्यात आली. मात्र, केवळ स्वच्छता करून मूळ प्रश्न सुटणार नाही. नामफलकाचे नूतनीकरण आणि परिसराचे सुशोभीकरण होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने मागणीची दखल घेऊन संपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.


प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्गाचा नामफलक नव्याने बसवावा, त्यावर स्पष्ट आणि ठळक अक्षरांत नामकरण करावे, तसेच परिसराचे सुशोभीकरण करावे. या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास ‘बोंबाबोंब’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मालगावचे उपसरपंच व आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे नेते तुषार खांडेकर  यांनी दिला आहे.


या मागणीसाठी तुषार खांडेकर, दक्षता समिती सदस्य विश्वासबापू खांडेकर, सागर आवळे, सचिन मोरे, जयंत मगरे, अविनाश भोरे, अंकुश आवळे, सूरज व्हनाळे आणि मनोज दोडमणी यांनी पुढाकार घेतला आहे.