महाराष्ट्रसामाजिक

बुधगावमध्ये संत सेना महाराज समाधी सोहळा : भक्तीचा जल्लोष, तेजस सन्मुखांचा सत्कार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

मिरज | बुधगाव नगरीत संत सेना महाराज समाधी सोहळ्याचा भक्तीचा जल्लोष रंगला. नाभिक समाजाच्या वतीने दि. २० ऑगस्ट रोजी झालेल्या या सोहळ्यात भक्तिभाव, किर्तनरूपी अमृतवर्षाव आणि महाप्रसादाचा आनंद असा अखंड उत्सव गावात उभा राहिला होता.

सलग तीन दिवस गावात किर्तनांच्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. शेवटच्या दिवशी ह.भ.प. अनंत कुंभार महाराजांच्या जोशपूर्ण निरुपणाने भक्तांना अध्यात्माचा अक्षरशः महासागर लाभला. गावातील सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची थाटामाटात व्यवस्था करण्यात आली होती.

या सोहळ्यात नाभिक समाजाच्या तेजस सन्मुख या होतकरू तरुणाचा विशेष सत्कार करण्यात आला. युजीसी नेट परीक्षेत तेजसने मिळवलेले यश हा संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला. ह.भ.प. कुंभार महाराज तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले.

या प्रसंगी नाभिक समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर चिखले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. गावातील वारकरी संप्रदाय, महिला मंडळी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या सोहळ्याच्या भव्य आयोजनामागे राजेंद्र काटकर, प्रल्हाद सन्मुख, माजी पोलिसपाटील बाळासाहेब सन्मुख, मारुती काशिद, सुधीर सन्मुख, नागेश सन्मुख, गणेश सन्मुख, संतोष सन्मुख, महेश काशिद, संतोष साळुंखे, दिलीप सन्मुख, नवनाथ सपकाळ, रविंद्र सन्मुख, दिगंबर साळुंखे, प्रकाश काटकर, किरण काटकर, अवधूत सन्मुख, जयंत सन्मुख, अविनाश काळे, सूरज काटकर यांच्यासह समाजबांधवांची मेहनत होती.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही