LiVE NEWS | UPDATE
रायगड | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
१६ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूने आळंदी सुन्न; सहलीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी करण्याची मागणी
रायगड प्रतिनिधी | सहलीचा आनंद लुटण्यासाठी हसत-खेळत घराबाहेर पडलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत विनर्स अकॅडमीच्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. अवघ्या १६ ते १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी आळंदीत पोहोचताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनारी फिरत असताना काही विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्राच्या लाटांचा वेग आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले. प्रवाहाच्या तीव्रतेमुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले आणि काही क्षणांतच आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर आक्रोशात झाले.
विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर एकच धावपळ उडाली. ‘महाकाली वॉटर स्पोर्ट्स’च्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने समुद्रात उतरून बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर आठही जणांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमित भारत अहिरे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी आळंदी आणि केळगाव परिसरातील रहिवासी होते.
सहलीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेनंतर सहलीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अकॅडमी प्रशासनाने पालकांकडून संमतीपत्रे घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष समुद्रकिनारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थी समुद्रात उतरले असताना शिक्षकांचे पुरेसे लक्ष होते का? धोकादायक समुद्रप्रवाहाबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या का? विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत देखरेख करणारे शिक्षक आणि कर्मचारी पुरेसे होते का? असे सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
सहलीसाठी संमतीपत्र घेणे एवढेच पुरेसे नसून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या दुर्घटनेत नेमकी चूक कोणाची होती, हे अधिकृत चौकशीतून स्पष्ट व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
