LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | मिरज पंचायत समिती, मिरज येथील विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. शिवानंद कोळी यांना पंचायत समिती सदस्य विनायक जाधव यांनी फोनवरून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘आम्ही आंबेडकरवादी संघटने’च्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले. शिवानंद कोळी हे पंचायत समिती मिरज येथे विस्तार अधिकारी (पंचायत) म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे कसबे डिग्रज बीटमधील कसबे डिग्रज, पद्माळे तसेच इतर ग्रामपंचायतींचे कामकाज आहे. तसेच ते कसबे डिग्रज प्रभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.
निवेदनात केलेल्या आरोपानुसार, मिरज पंचायत समिती सदस्य विनायक जाधव यांच्या भागातील एका कामासंदर्भात चर्चा सुरू होती. संबंधित कामासाठी शासकीय नियमानुसार अर्ज करण्याची विनंती विस्तार अधिकारी कोळी यांनी केली. मात्र, अर्ज करण्यास सांगितल्याच्या कारणावरून जाधव यांनी कोळी यांना फोनवरून अश्लील तसेच जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासकीय कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यावर दबाव, शिवीगाळ आणि धमकीचा प्रकार घडत असेल तर प्रशासनाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे. या प्रकारामुळे कोळी यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित पंचायत समिती सदस्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सचिन दादा सावंत (माजी नगरसेवक), सचिन कांबळे (उपसरपंच, बोलवाड), विश्वास खांडेकर, तुषार खांडेकर (उपसरपंच, मालगाव), बबन कोळी, वसंत खांडेकर, विलास मस्के, बी. के. पाटील, कुमार कोळी, विनायक सूर्यवंशी, जकीरहुसेन वजीर, सुलेमान मुजावर, चंद्रकांत नाईक, सचिन मोरे, अरविंद कुरणे, उमेश धेंडे, सतीश गस्ते, धनराज कांबळे, जयंत मगरे, परशुराम बनसोडे, सुजित लोखंडे, धीरज गोरे, रायप्पा नाईक, सतीश नाईक, सुधीर घोंगडे, संतोष कोळी, सलमान शेख, तुषार काळे, उमर गडकरी, जयसिंग कोळी, मारुती नाईक, सुरेश चौगुले तसेच आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे व कोळी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
