LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सांगली | मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार तथा टाकळी, बोलवाड आणि सुभाषनगर परिसराचे बीट हवालदार अमोल साहेबराव ढोले यांची बदली रद्द करून त्यांची पुन्हा त्याच बीटमध्ये नियुक्ती करावी, अशी मागणी टाकळी, बोलवाड, सुभाषनगर आणि मालगाव परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे. याबाबत सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
अमोल ढोले हे गेल्या सुमारे तीन वर्षांपासून या परिसरात बीट हवालदार म्हणून कार्यरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला असून, पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात असलेली भीती कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा दावा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केला आहे.
टाकळी, बोलवाड, सुभाषनगर आणि मालगाव परिसराची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक आहे. या भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांशी ढोले यांनी नियमित संपर्क ठेवला. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सण-उत्सव, पावसाळा, चोरीच्या घटना किंवा इतर संवेदनशील परिस्थितीत नागरिकांना सतर्क करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, असा दावा करण्यात आला आहे. तीन ते चार हजार नागरिकांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून दक्षतेचे संदेश पोहोचविले जात होते. त्यामुळे नागरिकांमध्ये सतर्कता वाढण्यास मदत झाली, असेही निवेदनात नमूद आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीमुळे परिसरातील वादविवाद आणि तंटे कमी होण्यास मदत झाली असून, नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे पोलीस विभागाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास आणि आपुलकीची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा परिस्थितीत अमोल ढोले यांची अचानक बदली झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. चांगले, जबाबदार आणि नागरिकांशी सुसंवाद साधणारे बीट हवालदार म्हणून ढोले यांची त्याच ठिकाणी पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बदली रद्द करून पुनर्नियुक्ती न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई सचिन कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. दीपाली कांबळे, पंचायत समिती सदस्या सौ. रिदा सुलेमान मुजावर, मालगाव गटाचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग परशुराम पाटील, बोलवाडच्या सरपंच निगार रियाज शेख, टाकळीच्या सरपंच हिना यासीम नदाफ, तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व शेकडो नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
