३५० किलो गांजा जप्त; दोन वाहनांसह तब्बल २ कोटींचा मुद्देमाल ताब्यात
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पोलिसांना चकमा देण्यासाठी वाहनाच्या केबिनमध्ये छुपी जागा तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाशिम जिल्हा पोलिसांनी समृद्धी महामार्गावर पर्दाफाश केला. जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजाविरोधी विशेष मोहिमेदरम्यान मालेगाव आणि कारंजा पोलीस हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये अंदाजे ३५० किलो गांजा जप्त करण्यात आला. दोन वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
केबिनच्या छताला फॉल्स सीलिंग; त्यामागे गांजाची पोती
पहिली कारवाई मालेगाव पोलीस हद्दीत समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली. पोलिसांना एक संशयास्पद वाहन आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन सोडून पलायन केले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळून आला.
दुसरी कारवाई कारंजा पोलीस हद्दीत छत्तीसगड पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, कारंजा पोलीस आणि जिल्हा वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी ट्रकच्या चालकाच्या केबिनच्या छताला विशेष पद्धतीने फॉल्स सीलिंग आणि छुपे कॅबिनेट तयार करून त्यामागे गांजाची पोती लपवण्यात आल्याचे उघड झाले.
तस्करांनी पोलिसांच्या नजरेतून गांजा सुटावा यासाठी वाहनात प्लास्टिकच्या क्रेट्स व इतर साहित्याच्या आड हा अमली पदार्थ लपवला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या तपासणीत तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला.
दोन्ही कारवायांत ३०० ते ३५० किलो गांजा
मालेगाव हद्दीतील पहिल्या कारवाईत अंदाजे १२० ते १५० किलो, तर कारंजा हद्दीतील दुसऱ्या कारवाईत सुमारे १५० ते २०० किलो गांजा जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही कारवायांमध्ये मिळून ३०० ते ३५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, दोन वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे.
तस्करीमागील मोठे नेटवर्क पोलिसांच्या रडारवर
या कारवाईबाबत वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल खाटमोडे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, छत्तीसगड पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कुठे पोहोचवला जाणार होता, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांपैकी एका गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या कारवाईमुळे गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
