LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
संजयनगर प्रतिनिधी | संजयनगर परिसरात ऑनलाइन कॅसिनो, मटका आणि जुगारासारखे कथित अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारांबाबत स्थानिक नागरिकांकडून आवाज उठविला जात असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संजयनगर परिसरात काही ठिकाणी मटका, ऑनलाइन कॅसिनो आणि जुगाराचे प्रकार उघडपणे सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकारांमुळे विशेषतः तरुण पिढी अशा व्यवहारांकडे आकर्षित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुगाराच्या आहारी जाऊन आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कथित अवैध धंद्यांच्या मागे ‘पुजारी’ नावाचा व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित व्यक्तीची भूमिका काय आहे, याची पोलिस प्रशासनाने चौकशी करणे आवश्यक आहे.
“या पुजाऱ्याची पूजा केल्याशिवाय पुढील कोणतीही पूजा पार पडत नाही,” असा उपरोधिक टोला लगावत, कथित सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. “या प्रकारांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे? संबंधित अवैध धंदे सुरू असताना यंत्रणेला त्याची माहिती नाही का?” असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीच परिसरातील कथित अवैध धंद्यांविरोधात आवाज उठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि संबंधित विभागाने केवळ किरकोळ कारवाई न करता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
*तरुणाईला जुगाराच्या विळख्यातून वाचविण्याची मागणी*
ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून कमी वेळेत पैसे मिळविण्याचे आमिष दाखविले जात असल्यास त्याचा तरुणांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारांचे नेटवर्क, त्यामागील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि संबंधित ठिकाणांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संजयनगर परिसराला कथित जुगार व ऑनलाइन कॅसिनोच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कारवाई झाली नाही तर नागरिकांच्या असंतोषाला आंदोलनाचे स्वरूप येऊ शकते, असा इशाराही काही स्थानिकांनी दिला आहे.
