मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर पहाटेपासून दोन अपघात ; चालक समीर शेख जखमी, रस्त्यावर केळींचा सडा
LiVE NEWS | UPDATE
खोपोली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील कनेक्टिंग लिंकवर आज पहाटेपासून अपघातांची मालिका पाहायला मिळाली. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवर केळी वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. त्यानंतर याच मार्गावर बस आणि ट्रकमध्येही भीषण धडक झाली. या दोन्ही अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मिसिंग लिंकवरील वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला होता. कनेक्टिंग लिंकवरून जात असताना अतिवेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक समीर शेख जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तातडीने खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रस्त्यावर केळींचा सडा
पिकअप टेम्पो पलटी झाल्याने त्यामध्ये वाहतूक करण्यात येत असलेल्या केळींचा मोठा साठा रस्त्यावर विखुरला. त्यामुळे कनेक्टिंग लिंकवर अक्षरशः केळींचा सडा पडल्याचे चित्र निर्माण झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर केळी पसरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती.
अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला हटविण्याचे तसेच रस्त्यावर पडलेल्या केळी हटविण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
बस-ट्रकचीही भीषण धडक
दरम्यान, याच कनेक्टिंग लिंकवर दुसऱ्या ठिकाणी बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. दोन्ही वाहनांची धडक झाल्याने बसमधील प्रवाशांसह सुमारे ६ ते ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एकाच दिवशी एकाच मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाल्याने वाहनचालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी या मार्गावर वाहनांची वर्दळ असताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार वाहन चालविणे आवश्यक असल्याचे या घटनांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
दरम्यान, टेम्पो अपघाताचे कारण अतिवेग असल्याची प्राथमिक माहिती असून, बस-ट्रक अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही घटनांबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, जखमींची सविस्तर माहिती आणि अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
