मानोरा | मानोरा नगरपंचायतीच्या मुंगसाजी नगर, प्रभाग क्रमांक १३ येथील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवि पकमोडे यांच्या नेतृत्वाखाली १२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नसबंदी केलेले कुत्रे मूळ ठिकाणी सोडले जातात का?
मुंगसाजी नगर येथे नगरपंचायतीचे प्राणी जन्म नियंत्रण केंद्र (ABC Center) कार्यरत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मानोरा तालुक्यातील इतर गावांमधून आणि वस्त्यांमधून पकडून आणलेल्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण केल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी सोडण्याऐवजी मुंगसाजी नगरमधील रहिवासी परिसरात सोडले जात असल्याचा आरोप आहे.
केंद्रीय प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ नुसार, नसबंदी व लसीकरणानंतर कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडण्यात आले, त्याच ठिकाणी परत सोडण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित केंद्रातून कुत्र्यांची ने-आण आणि त्यांना सोडण्याच्या प्रक्रियेची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न
परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कुत्र्यांच्या संभाव्य हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. भविष्यात एखादी गंभीर घटना घडू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तीन प्रमुख मागण्या; सात दिवसांचा अल्टिमेटम
निवेदनातून प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. प्राणी जन्म नियंत्रण केंद्राच्या वाहनांची आणि लॉगबुकची तातडीने तपासणी करून अनियमितता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच मुंगसाजी नगर परिसरात बाहेरील भागांतून आणून सोडण्यात आल्याचे आढळणाऱ्या कुत्र्यांबाबत नियमांनुसार योग्य कार्यवाही करावी.
याशिवाय, निवेदनाची दखल घेऊन सात दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास मुंगसाजी नगरमधील रहिवासी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

